
नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव नऊ रात्री आणि दहा दिवस चालतो. या काळात भक्त आदिशक्तीची आराधना करतात. प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री ही देवीची नऊ रूपे भक्तांसाठी प्रेरणादायी मानली जातात.
नवरात्रीची सुरुवात होते ती घटस्थापनेने जी यावर्षी २२ सप्टेंबर २०२५ रोजी होईल व शेवट हा २ ऑक्टोबर २०२५ म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होईल. घरात आणि मंदिरात देवीसमोर कलश बसवला जातो व अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. ही ज्योत आशा, श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक मानली जाते. महाराष्ट्रात देवीचे गोंधळ, जागर, भजन-कीर्तन यामुळे वातावरण भक्तिमय होते. गुजरातमध्ये तर नवरात्री म्हणजे रंग, नृत्य आणि आनंदाचा उत्सव! पारंपरिक गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी लोक रंगीबेरंगी पोशाख घालून एकत्र येतात.
हा सण फक्त धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे. कुटुंब, मित्र आणि समाज एकत्र येऊन नवरात्री साजरी करताना एकात्मतेची जाणीव होते. तसेच या काळात मिळणारी सकारात्मक ऊर्जा वर्षभर मनाला प्रेरणा देत राहते.