आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. सध्याच्या तंत्रबदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना बदलत आहे. नवे शैक्षणिक धोरण, ऑनलाईन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रशिक्षक, परदेशी विद्यापीठांचे भारतात झालेले आगमन अशा अनेक बाबींमुळे शिक्षकांना ऑनलाइन शिकवण, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, शिक्षणासंबंधी मोबाइल ॲॅप्स आणि वेबसाइट्स यांचा खुबीने वापर करून अध्यापन करावे लागेल.
शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा एक शिल्पकार असतो. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांची भूमिका अधिकच आव्हानात्मक आणि महत्त्वाची झाली आहे. विसाव्या शतकात शिक्षणाच्या कल्पना पारंपरिक होत्या. सध्याच्या तंत्र बदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना बदलत आहेत. नवे शैक्षणिक धोरण, ऑनलाइन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रशिक्षक (रोबोटिक), परदेशी विद्यापीठांचे भारतात झालेले आगमन अशा अनेक बाबींमुळे शिक्षकांना बदलावे लागणार आहे. ऑनलाइन शिकवण, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, शिक्षणासंबंधी मोबाइल ॲप्स आणि वेबसाइट्स यांचा वापर वाढला. शिक्षकांना या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करावे लागेल. पारंपरिक शिक्षणपद्धती आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे हे आजच्या शिक्षकांपुढील मोठे आव्हान आहे. म्हणूनच आजच्या युगात शिक्षकांनी कसे असले पाहिजे, याबाबत सविस्तर विचार करणे गरजेचे आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे. ते एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन आजघडीला शिक्षकी पेशाचा विचार करणे आवश्यक आहे.
आजचे जग वेगाने बदलत आहे. माहितीचा महासागर इंटरनेटवर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. त्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवीन शोध, वैज्ञानिक प्रगती, सामाजिक आणि आर्थिक बदल याबद्दल त्यांना माहिती असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी डिजिटल साक्षर असणे आवश्यक आहे. स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक ॲप्सचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी बनवता येते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जागतिक घडामोडींची माहिती देणे, विविध विषयांवर ऑनलाइन संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे हे आधुनिक शिक्षकांचे कर्तव्य आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतीत शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे होते, पण आजच्या युगात त्यांची भूमिका ज्ञान सोपे करून सांगणे आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे अशी झाली आहे. इंटरनेटमुळे आज माहिती सहज उपलब्ध असली तरी, त्या माहितीचे योग्य विश्लेषण करणे आणि तिचा योग्य वापर कसा करावा हे शिकवणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. प्रश्न विचारण्याचे, वाद-विवाद करण्याचे आणि स्वतःची मते योग्य प्रकारे मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि क्षमता ओळखून कारकिर्दीचा योग्य पर्याय निवडण्यास मदत केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर खूप शैक्षणिक आणि सामाजिक दबाव असतो. परीक्षेचा ताण, पालकांच्या अपेक्षा, सामाजिक माध्यमे आणि समवयस्कांकडून मिळणारा दबाव यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक ताण अनुभवतात. अशा वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिकच नव्हे तर मानसिक आधारस्तंभ म्हणून काम केले पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकून घेत मानसिक पातळीवर मदत केली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहित करून आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आधुनिक युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिक आणि सामाजिक मूल्यांची शिकवण दिली पाहिजे. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, सहकार्य, इतरांचा आदर करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यासारखी मूल्ये केवळ तोंडी सांगून चालणार नाही, तर शिक्षकांनी स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला सतत शिकत राहण्यास तयार ठेवले पाहिजे. नवीन शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम आणि अध्यापनाच्या पद्धती शिकून घेणे आवश्यक आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षकच नाही, तर स्वतःही एक विद्यार्थी असतात. नवीन तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांनी कार्यशाळा, प्रशिक्षण आणि चर्चासत्रांमध्ये आवर्जून भाग घेतला पाहिजे. शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे माध्यम आहे. शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. कोणताही विद्यार्थी कमजोर नसतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या लहान यशाचे कौतुक केले पाहिजे. शिक्षण प्रक्रिया केवळ शाळेतच घडत नाही. ती पालक आणि समाजाच्या सहकार्याने पूर्ण होते.
आज शिक्षणसंस्थांनीही शिकवण्याची पद्धत बदलून प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला पाहिजे. गुणांना कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. जागतिकीकरणाचे फायदे हवे असतील, तर आपल्या मुलामुलींना जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या भाषा शिकवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल. जागतिक पातळीवरच्या रोजगारांची चाहूल आपल्याकडील युवकवर्गापर्यंत पोहोचली की ते इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी आदी भाषा शिकायला फक्त तयार होतील असे नव्हे, तर उत्सुकही बनतील. यासाठी प्रचंड प्रमाणावर शिक्षक लागतील हे खरे आहे; परंतु नेमक्या याच ठिकाणी आपण इ-शिक्षण, आभासी शाळा (व्हर्च्युअल क्लासरूम) अशा बाबींचा वापर करू शकतो! माहिती तंत्रज्ञान-सक्षमित शिक्षणपद्धतीचा आपल्याला मोठा उपयोग होणार आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि त्याला वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते. शैक्षणिक ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
कोरोनानंतरच्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये अनेक व्यक्ती डिजिटल तंत्रज्ञान वापरू लागल्या. यात इमेल, सोशल मीडिया, इ व्यापार, ऑनलाइन व्यवहार यांचा समावेश होतो. यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती अनेक उद्योगांच्या हाती लागली आहे. या माहितीचा अनेक वेळा गैरवापर होताना आढळतो. या बाबतीत प्रचलित कायदे फारसे प्रभावी नाहीत. इथेच नैतिकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यवसायाचा हेतू फक्त लाभ असाच असता कामा नये. हे बाळकडू शालेय शिक्षणपद्धतीत अंतर्भूत केलेच पाहिजे. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आत्तापर्यंत कोरलेले चित्र बदलायला हवे. पाया बळकट करून, प्रात्यक्षिकांवर भर देऊन, कार्यसंस्कृती अवलंबून रोजगारक्षम विद्यार्थी घडवणे हे आजच्या जमान्यात शिक्षकांचे खरे कार्य आहे. त्याचबरोबर मूल्ये, नीतीमत्ता, राष्ट्रप्रेम, सर्वसमावेशकता, संवेदनशिलताही महत्त्वाची आहे. स्वयंशिस्त आणि चांगला नागरिक घडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ बनले पाहिजे. त्यांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- डॉ. दीपक शिकारपूर