मुंबई: लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रिल तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनादरम्यान पोलिस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना, फोटोग्राफरने आपल्या रिलमध्ये चुकीचा संदेश देत तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता.
लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी रिल्सच्या माध्यमातून त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. यादरम्यान लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रिल बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?
सदर फोटोग्राफरने तयार केलेल्या या व्हिडिओत लालबागच्या राजाचे दर्शन श्रीमंत लोकांसाठी तसेच सेलिब्रिटींसाठी सोईस्कर आणि सर्व सामान्यांसाठी खड:तर असे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी समाज माध्यमात खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याने पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.
लालबागचा राजाच्या विसर्जनाला उशीर झाल्यामुळे या संदर्भात अनेक चर्चा झाल्या होत्या. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला खरा, मात्र अपेक्षेप्रमाणे त्याचे विसर्जन दीड-दोन तासांमध्ये झाले नाही. समुद्राला आलेली भरती आणि तांत्रिक कारणामुळे त्याचे विसर्जन रखडले. जे रात्री ९ वाजता झाले.
लालबागचा राजाच्या विसर्जनाचे वाद
यावर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांवर केला जाणारा अन्याय आणि श्रीमंत लोकांना दिल्या जाणाऱ्या खास ट्रीटमेंटमुळे, लालबागचा राजा मंडळ आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली. त्यानंतर परंपरेनुसार लालबागच्या राजाचे विसर्जन देखील वेळेत झाले नाही. यासंदर्भात एका कोळी बांधवाने प्रतिक्रिया दिली होती, जी मंडळाच्या विरोधात होती, त्यामुळे गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर (Hiralal Wadkar) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा लालबागचा राजा मंडळाने दिला. हे प्रकरण ताजे असताना आता लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) गैरसमज निर्माण करणारे रिल (Reel) तयार केल्याप्रकरणी फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे, गणेशोत्सव संपून ५ दिवस झाले असले तरी, लालबाग राजाशी संबंधीत वाद अद्याप संपले नसल्याचे दिसून येत आहे.