Wednesday, September 10, 2025

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’

मुंबई (खास प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा’ (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा’ (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क २,५०० रुपयेइतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल.

Comments
Add Comment