Wednesday, September 10, 2025

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

भटक्या श्वानांचे लसीकरण २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिका आणि विविध प्राणी कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबईतील भटक्या श्वानांसाठी १ सप्टेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ दरम्यान सामूहिक रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईकर नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तसेच युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी या प्राणी कल्याण संस्थांसोबत मिळून ही मोहीम राबविण्यात येत आहे.स्थानिक रहिवासी, कल्याणकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, प्राण्यांना खाऊ घालणारे व प्राणी सेवक यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच, लसीकरणासाठी येणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांना परिसरात प्रवेश देणे व भटक्या श्वानांची ओळख पटवून देणे इत्यादी कार्यवाहीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment