Tuesday, September 16, 2025

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी सेवा फाउंडेशनचे मिथुन राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली.

अनेक वर्षांपासून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी प्रलंबित आहे. एकच खानपान, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. आंध्रा तेलंगणामध्ये एस.टी. प्रवर्गात कर्नाटकमध्ये एस सी. प्रवर्गात, गुजरात व हरियाणामध्ये ओबीसी, दिल्लीत एससी तर महाराष्ट्रामध्ये व्ही. जे. प्रवर्गामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.

मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर (१९२०) नुसार अनुसूचित जमाती वर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांनी दिले आहे.बंजारा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी विनंती केली आहे.

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा