
पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात होत असतात. पण यावेळी समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे महामार्गावरून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला, चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने महामार्गावर खिळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.
प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा. मात्र प्रत्यक्षात प्रकरण काही वेगळेच होते. मुळात रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता संबंधित प्रशासन नेमकं काय कारवाई करतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले
समृद्धी मार्गावर पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटले. त्यामुळे समृद्धी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री ४ तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. जर पुलाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड्स का लावले नाही? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीनंतर आता दुरुस्तीच्या कामादरम्यान रस्त्यावर लावलेले खिळे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत आणि आता त्या भागातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.