
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी एका विशेष अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. हे अभियान संपूर्ण देशात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत राबवले जाणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज, सोमवारी एक्सवर माहिती दिली की या अभियानाअंतर्गत ७५,००० आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि अन्य आरोग्य सुविधा केंद्रांवर लावली जातील.
नड्डा यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश देशभरातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा सुधारण्यात आहे, जेणेकरून त्यांना उच्च दर्जाची देखभाल आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. त्यांनी पुढे सांगितले की, ही शिबिरे विशेषतः महिला आणि मुलांच्या आरोग्यविषयक गरजांवर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आली आहेत आणि ही सरकारच्या समावेशक आरोग्यसेवेच्या दृष्टीकोनाला पुढे नेणारी आहेत.
याशिवाय, सर्व आंगणवाड्यांमध्ये ‘पोषण महिना’ साजरा केला जाईल, जेणेकरून पोषण, आरोग्य जनजागृती आणि एकूणच उत्तम जीवनशैलीला प्रोत्साहन देता येईल.या सर्व उपाययोजनांचा मुख्य उद्देश असा आहे की, देशातील कुटुंबे आणि समुदाय अधिक आरोग्यदायी व सक्षम बनावेत.
आरोग्यमंत्री नड्डा यांनी सर्व खासगी रुग्णालये आणि आरोग्य क्षेत्रातील इतर भागीदारांना आवाहन केले की त्यांनी पुढे येऊन या जनभागीदारी अभियानाचा भाग व्हावे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,“‘इंडिया फर्स्ट’ या भावनेने प्रेरित होऊन, चला आपण सर्वजण मिळून ‘विकसित भारत’ साठी आपले सामूहिक प्रयत्न अधिक बळकट करूया.”