Saturday, September 13, 2025

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. नेपाळमधल्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव झाला. रस्त्यावर आलेल्या तरुणाईने कम्युनिस्ट सरकारला खाली खेचले. तरुणांनी पळवून पळवून ओली सरकारच्या मंत्र्यांना तसेच माजी कम्युनिस्ट पंतप्रधानांना बेदम चोपले. असंख्य आंदोलक संसदेत तसेच मंत्र्यांच्या घरात घुसले. ठिकठिकाणी लुटालूट, तोडफोड, जाळपोळ सुरू झाली. परिस्थितीचा अंदाज येताच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे ओली यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर ओली यांनी विशेष हेलिकॉप्टरमध्ये बसून सहकुटुंब सरकारी बंगला सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केपी शर्मा ओली विशेष विमानाने दुबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. ते दुबईत आश्रय घेण्याची शक्यता आहे. थोड्या वेळापूर्वी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला.

सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गांनी आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघावा म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे, असं ओली यांनी जाहीर केलं आहे. “मला नेपाळच्या राज्यघटनेतील कलम ७६ (२) नुसार पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. देशातली सध्याची असामान्य परिस्थिती लक्षात घेता आणि त्यावर राजकीयदृष्ट्या घटनात्मक तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नांना हातभार लागावा म्हणून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. नेपाळच्या घटनेच्या कलम ७७ (१) नुसार मी ताबडतोब पदावरून पायउतार होत आहे, असंही ओली यांनी जाहीर केलं.

नेपाळमध्ये संतप्त आंदोलकांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली. सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये आतापर्यंत २० आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.

याआधी नेपाळमध्ये सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया बंदी विरोधात तरुणाईने आंदोलन केले. नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याला विरोध म्हणून तरुणाई रस्त्यावर आली आणि हिंसक आंदोलन करू लागली. सरकारी आदेश येताच जवानांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात १८ जणांचा मृत्यू झाला आणि २५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. यानंतर नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. काही तासांनंतर नेपाळच्या कृषीमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात तीव्र आंदोलन सुरू असल्याचे बघून राजीनामा दिला. परिस्थिती तासातासाने बिघडत गेली. अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. ओली यांच्या पाठोपाठ आता नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला. आतापर्यंत नेपाळमध्ये २० आंदोलकांचा मृत्यू झाला असून शेकडो आंदोलक जखमी झाले आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नेपाळमध्ये निर्नायकी परिस्थिती आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा