
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास
नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४, चांद्रयान ५ आणि व्हीनस ऑर्बिटर मिशनसह महत्वाकांक्षी भविष्यातील योजना जाहीर केल्या आहेत. तसंच या सगळ्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली. भारतीय अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत स्थापन होईल, तर भारत २०४० पर्यंत चंद्रावर सुरक्षित लँडिंगचे लक्ष्य भारत साध्य करेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे. यामुळे देशाचा अंतराळ कार्यक्रम जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर जाईल असाही विश्वास इस्रोच्या अध्यक्षांना आहे.
मागील महिन्यात २३ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या मुख्य कार्यक्रमात बोलताना, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली होती की, भारत चांद्रयान ४ मोहीम सुरू करणार आहे, ज्यामध्ये व्हीनस ऑर्बिटर मोहीम देखील समाविष्ट असेल. दरम्यान आज याबाबतच तपशील नारायणन यांनी दिले. इस्रो प्रमुखांनी भर दिला की २०३५ पर्यंत भारत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करेल, ज्याचे पहिले मॉड्यूल २०३५ मध्येच लाँच केले जाईल. ते म्हणाले की, भारत २०४० पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवेल. ज्यामुळे भारताचा अंतराळ विषयक कार्यक्रम जगात अव्वल स्थानावर पोहोचेल.
नारायणन म्हणाले चांद्रयान ४, चांद्रयान ५ वर काम करत आहोत आणि अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल कक्षेत ठेवले जाईल. संपूर्ण मॉड्यूल २०३५ पर्यंत तयार होणार आहे आणि आम्ही अनेक वर्षांपासून गगनयानवर काम करत आहोत आणि या वर्षी २०२७ च्या पहिल्या तिमाहीत एक मानवरहित मोहीम आणि एक मानवयुक्त मोहीम असेल. इस्रोचे अध्यक्ष म्हणाले, आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत. अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि प्रशांत नायर यांना अमेरिकेत पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यांचा अंतराळ प्रवासाचा संपूर्ण अनुभव आमच्या गगनयान कार्यक्रमासाठी वापरला जाईल.
२०४० पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर पडणार
नारायणन म्हणाले की, त्यांच्या मार्गदर्शन आणि दृष्टिकोनाच्या आधारे, आम्ही चांद्रयान-४ मोहीम सुरू करणार आहोत. आम्ही व्हीनस ऑर्बिटर मोहीम सुरू करणार आहोत. आम्ही २०३५ पर्यंत बीएएस (भारतीय अंतराळ स्थानक) सुरू करू. आम्ही एक अंतराळ स्थानक स्थापन करणार आहोत ज्याचे नाव आहे ‘भारतीय अंतरिक्ष स्टेशन’ आणि याचे पहिले मॉड्यूल २०२८ मध्ये लॉन्च केले जाईल. पंतप्रधानांनी एनजीएल (नेक्स्ट जनरेशन लाँचर) ला मान्यता दिली आहे. २०४० पर्यंत, भारत मानवाला चंद्रावर उतरवेल आणि आम्ही त्यांना सुरक्षितपणे परतही आणू. अशा प्रकारे, २०४० पर्यंत, भारतीय अंतराळ कार्यक्रम जगातील इतर कोणत्याही अंतराळ कार्यक्रमाच्या तोडीस-तोड असेल. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.