
नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्ते कामांची माहिती उपलब्ध
मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाकडे वाटचाल करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण सुरू आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांचा मौल्यवान वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होत आहे. रस्ते काँक्रिटीकरण कामांच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ ही विशेष लिंक सुरू केली आहे. या डॅशबोर्डवर परिमंडळनिहाय व विभागनिहाय रस्ते काँक्रिटीकरणाची प्रगती पाहता येईल.
पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे तसेच कामे सुरू न झालेल्या रस्त्यांची माहिती यामध्ये उपलब्ध आहे. एवढेच नव्हे, तर यंदाचा पावसाळा संपल्यानंतर कोणत्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले जाणार आहे, त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, याचेही अंदाजित वेळापत्रक पाहता येणार आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे मुंबईकरांना रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पारदर्शक माहिती घरबसल्या मिळणार असून, ‘खड्डेमुक्त मुंबई’चा आराखडा अधिक ठळकपणे नागरिकांसमोर येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाकांक्षी सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि जलद होणार आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प राहते, परिणामी देखभाल आणि परिरक्षणाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचतो. दीर्घकाळ टिकणारे हे रस्ते नागरिकांना खड्डेमुक्त व सुरळीत वाहतुकीचा अनुभव देणार आहेत. मुंबईच्या विकासात याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येणार आहेत.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित आणि सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टीने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे प्रमुख व दुय्यम मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान आणि शिस्तबद्ध होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सोयीसुविधा, वेळेची बचत आणि आरामदायी अनुभव यांचा लक्षणीय लाभ होणार आहे.
महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर चौक ते चौक (Junction to Junction) अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत (Half Width) याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.
टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. निर्धारित कालमर्यादेत, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन काँक्रिटीकरण कामे दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्ता राखून करण्यात आली आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (Third Party) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून काँक्रिटीकरण कामे पुन्हा वेगाने सुरू केली जाणार आहेत. काँक्रिटीकरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous संकेतस्थळावर काँक्रिटीकरण प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व रस्त्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावर 'नागरिकांकरीता' (For Citizens), त्यात ‘स्थिती जाणून घ्या’ (Check Status) मधील ‘Mega CC Road Works Progress’ या लिंक वर जाऊन माहिती पाहता येईल. परिमंडळनिहाय व विभागनिहाय पूर्ण झालेले रस्ते, पावसाळ्यापूर्वी अंशतः पूर्ण झालेले रस्ते तसेच अजून काम सुरू न झालेल्या रस्त्यांच्या माहितीचा त्यात समावेशआहे. पावसाळ्यापूर्वी अंशतः पूर्ण झालेले रस्ते तसेच अजून सुरू न केलेल्या रस्त्यांचे काम या पावसाळ्यानंतर कधी सुरू होणार याची माहिती तसेच या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी याचे वेळापत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे. https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या डॅशबोर्डवर एखाद्या विशिष्ट रस्त्याची माहिती त्या रस्त्याच्या नावाने शोधण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. तसेच 'मॅप' वर रस्ता शोधून त्यास 'क्लिक' केल्यावर देखील माहिती मिळू शकते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, काँक्रिटीकरण कामाच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी महानगरपालिकेकडून हे पाऊल उचलले जात आहे. आजवर संपूर्णत: किंवा अंशत: पूर्ण झालेल्या रस्ते काँक्रिटीकरण कामांची माहिती डॅशबोर्डवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर सुरू होणा-या कामांचा रस्तेनिहाय अंदाजित कालावधीदेखील नमूद करण्यात आला आहे. खड्डेमुक्त मुंबई हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर कामे सुरू असताना नागरिकांना असुविधा होणार नाही, अशाप्रकारे ही कामे करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहिल. रस्ते कामांची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची राहिल, याबाबत कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असेदेखील बांगर यांनी स्पष्ट केले.
अ) रस्ते काँक्रिटीकरण (टप्पा १ व २) माहिती
१) रस्ते संख्या - २१२१ २) एकूण लांबी - ६९८.७३ किलोमीटर
ब) काँक्रिट कामे पूर्ण -
१) रस्ते संख्या - ७७१ २) एकूण लांबी - १८६.०० किलोमीटर
क) काँक्रिट कामे अंशत: पूर्ण -
१) रस्ते संख्या - ५७४ २) एकूण लांबी - १५६.७४ किलोमीटर
ड) सुरू होणारी काँक्रिट कामे
१) रस्ते संख्या - ७७६ २) एकूण लांबी - २०८.७० किलोमीटर