Monday, September 8, 2025

अमेरिकन टेनिसची नवी तारका

अमेरिकन टेनिसची नवी तारका

आर्यना सियारहिजेउना सबालेंका ही अमेरिकन ओपन टेनिसची यंदाची नवी तारका ठरली आहे. तिने नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात अमांडा अनिसिमोव्हाला ६-३, ७-६ असा विजय मिळवला. आज सर्वात महान खेळाडू म्हणून ती ओळखली जाणार. सबालेंकाचे हे चौथे आणि या वर्षातील अखेरचे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास निश्चितच वेदनादायक आणि खडतर होता. कारण अमेरिकन टेनिस ओपन विजेतेपद ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळली जाते. त्यामुळे येथे प्रत्येक खेळाडूचा आणि त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यातही ती महिला असेल तर जास्तच अवघड जाते. त्यामुळे अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणे ही तशीही आगळीवेगळी बाब आहे. ती यंदा आर्यनाने करून दाखवली आणि तिचे हे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आर्यना हिने आता किम क्लिस्टर्स, आरांता विकारिओ, नाओमी ओसाका आणि हाना मॅँडलिकोवा यांच्याशी बरोबरी साधली आहे. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यावर त्याच खेळाडूवर म्हणजे अनिसिमोव्हाबरोबर खेळण्यासाठी ती उतरेल असे कुणालाही वाटले नव्हते. पण आर्यनाने ही जिद्द दाखवली आणि तिने विजयही मिळवून दाखवला. खरे तर हा सामना गुंतागुंतीचा होता. पण जेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्याा आर्यना सबालेंका हिने पहिल्यापासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं. पहिला सेट ६-३ असा एकतर्फी आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्येही प्रतिस्पर्धी आणि पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी खेळणाऱ्या अमांडा अनिसिमोव्हा हिने तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ती फिकी ठरली. हा सेट ७-६(३) असा जिंकत सबालेंकानं या स्पर्धेतील विजयी सिलसिला कायम ठेवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

आर्यनाने अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने लढा दिला आणि तिच्या भावनांना हाताळण्यास ती सक्षम ठरली ती खरोखरच प्रशंसेस पात्र आहे. आर्यना ही जास्त निडर आणि स्पष्ट विचारांची आहे. आर्यना सबालेंकाने विम्बल्डनच्या पराभवाचा बदला घेतला आहे, असे आता टेनिस जगतात बोलले जाऊ लागले आहे. त्याबरोबरच बेलारूसच्या या सुंदरीच्या विजेतेपदाचे अनिसिमोव्हाचे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. अनिसिमोव्हाला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असतानाही त्याने विचलित न होता सबालेंका शांत आणि थंड डोक्याने खेळली. आपल्या घरच्या मैदानावर अनिसिमोव्हाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. पण सबालेंका शांत राहिली आणि थंड डोक्याने तिने आपले जोरदार फटके खेळले. विजेतेपद असेच घडत असतात. अगेन्स्ट ऑल ऑड्स जो विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. हे सबालेंकाने दाखवून दिले. यूएस ओपन टेनिस हे हार्ड कोर्टवर खेळले जाते आणि त्यात मोठ्या सर्विस करणाऱ्यांना तितकेसे अनुकूल वातावरण नसते. याअर्थाने हार्ड कोर्ट हे विविध शैली असलेल्या आणि खेळण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असलेल्या खेळाडूंना उपयुक्त असते. या खेळातील सर्व्हिसचा वेग, चेंडूचा वेग आणि अनिश्चितता यावर मात करत सबालेंकाने विजय मिळवला हेच तिच्या विजयाचे वैशिष्ट्य. हार्ड कोर्ट हे टेनिसमधील सर्वात जलद सर्व्हिसचे माहेरघर मानले जाते. पण हार्ड कोर्टवर खेळताना खेळाडूंसाठी एक अत्यावश्यक बाब म्हणजे त्याचे शारीरिक चापल्य आणि मानसिक संतुलन. या दोन्ही बाबतीत आर्यनाने अप्रतिम कौशल्य दाखवले आणि विजय मिळवला. १८ वेळा ग्रँडस्लॅम विजेती राहिलेली मार्टिना नवरातिलोव्हा हिच्या मते सबालेंका हिने दाखवलेला संयम आणि तिची शक्ती हीच तिच्या विजयाची गुरूकिल्ली होती. अत्यंत दबाव असतानाही आर्यनाने ती टेनिसची चॅम्पियन आहे हे दाखवून दिले.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ही हार्ड कोर्टवरील सर्वात अवघड स्पर्धा समजली जाते पण तिच्या आव्हानांतच तिची ताकद समाविष्ट आहे. टेनिसमध्ये आज क्रिकेटइतकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पैसा आहे, कारण टेनिस हा खेळ आता प्रगत देशात खेळतात आणि भारतही त्यात मागे नाही. भारताचे विजय अमृतराज आणि लिअँडर पेस आणि महेश भूपथी यांनी देखील भारताचे नाव राखले. पण भारताच्या महिलांनी तशी शानदार कामगिरी केली नाही. पण त्यांना उत्तर अमेरिकन टेनिस खेळाडूंचे आहे. या खेळाडूंना पुरुषांइतकेच चापल्य आणि तंदुरुस्ती दाखवावी लागते. तेव्हा कुठे त्या यशस्वी होतात. ते या सर्व खेळाडूंनी केले आहे. आर्यना सबालेंका हिने अत्यंत गंभीर आव्हानांवर मात करत अमेरिकन ओपन टेनिसचे विजेतेपद जिंकले आहे. त्यात प्रथम होती खांद्याला झालेली दुखापत आणि त्यातून तिच्या सर्व्हिसवर परिणाम करणारे आरोग्याचे प्रश्न आणि त्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळण्याची कसरतही करावी लागते. कारण क्रिकेटप्रमाणेच टेनिस हाही खेळ शारीरिक कमी आणि मानसिकरीत्या जास्त ताकदीचा आहे आणि जो मानसिकदृष्ट्या प्रबळ असतो तोच विजेता होतो. या सर्वांवर मात करून आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले आणि तिच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. अजून सबालेंकाला बरीच मजल मारायची आहे. सबालेंकाने नुकतेच आपले वडील गमावले. त्या काळात ती मानसिकरीत्या पूर्णपणे ढासळली होती. त्यावर तिला मात करायची होती. त्यामुळे तिने सर्व संकटांवर मात करून अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले हे निश्चितच तिच्या प्रखर निर्धाराचे आणि विजेतेपदासाठी काहीही करण्याची तयारी दाखवून देते. कधीकधी आर्यना आपला संयम हरवते आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यावर संतापते. असे या वरच्या दर्जाच्या खेळाला चालत नाही. हा धडा ती शिकली आहे आणि काल ती ज्या संयमाने आपली टेनिसची रॅकेट फिरवत होती त्यावरून तिने या उणीवेवर मात केली आहे असे दिसते. या नव्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तारकेला सलाम.

Comments
Add Comment