Tuesday, September 9, 2025

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी

मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तब्बल ३३ तासांनंतर पार पडलेल्या या विसर्जनामुळे आणि तेही चंद्रग्रहणाच्या वेळेत झाल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे. यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विलंबाचे कारण आणि कोळी बांधवांचा संताप

यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून खास तराफा मागवण्यात आला होता, मात्र या तराफामुळेच विसर्जन प्रक्रिया १३ ते १४ तास रखडली. यामुळे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करणारे मुंबईतील कोळी बांधव संतप्त झाले आहेत. त्यांनी याला "बाप्पा आणि समस्त कोळी समाजाचा अपमान" असे म्हटले आहे. वर्षानुवर्षे कोळी समाज हा विसर्जन सोहळा यशस्वी करत आला आहे, मात्र यंदा त्यांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मच्छिमार समितीच्या ४ प्रमुख मागण्या

१. दोषींवर गुन्हे दाखल करा: विसर्जन सोहळ्याला विलंब झाल्यामुळे आणि चंद्रग्रहणात विसर्जन झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याला जबाबदार असलेल्या मंडळाच्या कार्यकारी समितीतील सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

२. कार्यकर्त्यांवर कारवाई करा: विसर्जन सोहळ्यादरम्यान कोळी बांधवांना चुकीची वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी. जर तो पोलीस किंवा उद्योपतीचा सुरक्षा रक्षक असेल, तर त्याला सेवेतून बडतर्फ करावे.

३. दर्शन पद्धतीत बदल: दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी आणि 'व्हीआयपी संस्कृती' यामुळे सामान्य भाविकांना त्रास होतो. व्हीआयपी दर्शनासाठी केवळ एक दिवस ठेवावा आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी देखाव्याचा पंडाल मोकळा करावा.

४. इतिहासाचा सन्मान राखा: १९३४ मध्ये लालबागच्या राजाची स्थापना कोळी समाजातील महिलांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल केली होती, या इतिहासाचा मंडळाने आदर करावा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >