
समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा
दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत दापोली – मंडणगड व खेड तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेस ग्रामविकास व पंचायतीराज राज्य मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक तसेच सरपंच यांना संबोधित करताना मंत्री महोदयांनी सांगितले की, “लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून तालुकास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर तब्बल ३०० कोटी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. आपल्या मतदारसंघाने राज्यात सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत यासाठी अधिकारी व सरपंचांनी विशेष प्रयत्न करावेत” असे आवाहन केले. यावेळी मंत्री महोदयांनी विश्वास व्यक्त केला की, “१७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून बक्षिसे जिंकेल.”
कार्यशाळेस जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानडे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली/खेड गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात, माजी पंचायत समिती सभापती दापोली किशोर देसाई, शिवसेना दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी, तसेच दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.