Monday, September 8, 2025

एसआयपी गुंतवणुकीत रेकॉर्डब्रेक गुंतवणूक

एसआयपी गुंतवणुकीत रेकॉर्डब्रेक गुंतवणूक

मोहित सोमण

एक काळ होता नागरिक शेअर बाजारात गुंतवणूक करायला कचरत असत. पण एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोष्टी बदलत गेल्या. आज २०२५ मध्ये गुंतवणूकदार जागृत आहेत ही मोठी बाब आहे. आज आपण विकसित भारताकडे मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सरकारने लोकांमध्ये बचतीसह गुंतवणुकीची प्रवृत्ती रूजावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत ग्राहकांचा कलही वाढत आहे. महिलाही म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मागे नाहीत. चांगला नफा, चांगला परतावा कोणाला नकोय? त्यामुळे एसआयपीकडे लोकांचा झुकला जाणारा कल पाहता म्युच्युअल फंड उद्योग मोठ्या प्रमाणात फुलला आहे. त्याचा सबळ पुरावा म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत विशेषतः एसआयपीत प्रचंड वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार जुलै महिन्यात एसआयपी गुंतवणूक २८४६४ कोटींवर पोहोचली आहे. जून महिन्यात २७२६९ कोटींवरून ही वाढ जवळपास ४% नोंदवली गेली आहे. एकाच महिन्यात चार टक्के वाढ ही खेळत्या भांडवलासाठी स्वागतार्ह बाब आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या स्थितीतही ही वाढ भारतीय गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील समज प्रतिबिंबित करत आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचा मनात प्रश्न उपस्थित असेल एसआयपी गुंतवणुकीचे भविष्य काय त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी हा लेख प्रप्रंच..

एसआयपी (Systematic Investment Plan) म्हणजे मराठीत पद्धतशीर गुंतवणूक योजना. शेअर व भांडवली बाजारातील बदलत्या समीकरणाचे फायदे तोटे आहेत. त्यातून आपल्या गरजा बघता आपल्या दृष्टीने काय योग्य आहे याचा विचार करून एसआयपीत गुंतवणूक फायदेशीर ठरते. यापूर्वीही तज्ज्ञांनी अनेक वेळा संतुलित एसआयपीतील गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. केवळ पोस्ट अथवा एफडीपेक्षा अधिक परतावा मिळेल या एकाच उद्देशाने एसआयपीत गुंतवणूक करत असाल तर स्पष्टच सांगायचे झाले तर ते योग्य ठरणार नाही. विशेष उद्देशाने केलेली गुंतवणूक मात्र एसआयपीत फायदेशीर ठरू शकते. आपल्या घरगुती गरजा, मुलांचे शिक्षण, इतर आर्थिक गरजा, मुलांचे विवाह, जन्म, मृत्यू, इतर आजारपणे यावेळी ही अतिरिक्त गुंतवणूक कामी येते. अशातच ठरावीक काळासाठी असलेली गुंतवणूक पाहता त्यातून योग्य पद्धतीने फायदा घेणे आवश्यक आहे. एसआयपी माध्यमातून ते सहज शक्य आहे. नियामक मंडळ सेबीने आपली नियमावलीही कडक केल्याने बाजारातील पारदर्शकता आता वाढली. आता लेवरेज घेण्यासाठी चांगला फंड मॅनेजर असण गरजेचे आहे. केवळ फंड मॅनेजर नाही तर योग्य योजना निवडणेही गरजेचे आहे. सध्या विविध खासगी वित्तीय संस्थाचे एसआयपी म्युच्युअल फंड पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातही बँकिग फंड, डिफेन्स फंड, मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्जकॅप, फ्लेक्सीकॅप, बँलन्स फंड, रिअल्टी फंड हेल्थकेअर, हाय रिस्क फंड, लो रिस्क फंड, क्वालिटी फ्लेक्सी फंड असे विविध प्रकारचे फंड बाजारात उपलब्ध आहेत. कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आपल्याला व फंड मॅनेजरला योग्य वाटते तो पर्याय आपण निवडू शकतो. रिस्क नाही असा फंड नाही त्यामुळे मार्केट लिंक रिस्क तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करताना ग्राह्य धरावीच लागते त्याशिवाय गुंतवणूक परतावाही शक्य नाही. एसआयपी साधारणतः दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरेल.

आता नक्की एसआयपीचे कुठले प्रकार आहेत ते समजून घेऊयात. साधारणतः एसआयपीत दोन प्रकार आहेत. प्रथम आपण बाजारात एकरकमी पैसे गुंतवू शकतो अथवा दरमहा ठरावीक रक्कमही भरण्याचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. आपल्या गरजा, उद्दिष्टे, बाजारातील परिस्थितीची सांगड घालताना त्यातील गुंतवणूक किफायतशीर नफा भविष्यात देते. उदाहरणार्थ तुम्हाला भविष्यातील एक मोठ्या खर्चिक कारणांची चाहूल लागल्यास तो एक रकमी पैसा देता यावा, यासाठी गुंतवणूक केल्यास एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मात्र भविष्यात दरमहा गुंतवणूक सुरू ठेवल्यास फायदा पुनर्रचित होऊन जोपर्यत पैसै काढत नाही तोपर्यंत गुंतवणूक ठेवल्यास एकूण बाजारातील संचित फायदा (Yield) आपल्याला मिळू शकतो. बहुतांश तज्ज्ञ एकूण ठरावीक रक्कम टाकण्यापेक्षाही दरमहा गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात; परंतु निर्णय सर्वस्वी गुंतवणूकदारांचा असतो. आपली गरज ओळखून तशी गुंतवणूक करणे अपेक्षित असते.

अनेकदा एसआयपीमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी नियमितपणे लहान रकमेची गुंतवणूक केली जाते, एसआयपीमध्ये तोटा होण्याचा धोका एसआयपी गुंतवलेल्या म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. एसआयपी बाजारातील अस्थिरता कमी करू शकतात; परंतु जर फंडाच्या अंतर्निहित गुंतवणुकीची कामगिरी खराब झाली तर नकारात्मक परतावा मिळू शकतो. अशावेळी पैशाची अत्यावश्यक चणचण वाढल्यास अथवा काही कारणांमुळे गुंतवणूक काढायची झाल्यास ती एसआयपीत शक्य आहे. भारतातील अर्थव्यवस्थेत काय बदल होतील यावर ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे जे भविष्यात फायदा देईल. त्यासाठी खात्रीलायक फंड मॅनेजरची गरज आहे. उपलब्ध असलेल्या एसआयपीतील गुंतवणूक पँटर्नचा अभ्यास केल्यास योग्य फंड आपल्यासाठी कुठला ते कळते आणि विशेषतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारातील गुंतवणूक सध्या काढत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारातील नुकसान कमी करण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. असे असताना मात्र योग्य गुंतवणूक करणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान भारतातील एसआयपी गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत असताना सेबी अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी म्युच्युअल फंडात स्त्रियांनी गुंतवणूक केल्यास त्यांना इन्सेंटिव देणार असल्याचं घोषित केले आहे. समाजातील सगळ्याच प्रवर्गात लोकांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एसआयपी गुंतवणुकीत वाजवी गुंतवणूक करावी.

Comments
Add Comment