Tuesday, September 9, 2025

बेल्जियममधून मेहुल चोक्सीला भारतात आणणार ?

बेल्जियममधून मेहुल चोक्सीला भारतात आणणार ?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झाल्याचा आरोप असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला लवकरच बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. मेहुलला ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारच्यावतीने बेल्जियमला ठोस आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीने जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज बेल्जियमच्या अपील न्यायालयाने फेटाळला आहे.

अटक टाळण्यासाठी भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत आता बेल्जियममध्ये जाऊन पोहोचला आहे. सीबीआयने पाठवलेल्या हस्तांतरणाच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. बेल्जियमच्या न्यायालयाने मेहुल चोक्सीचा अटकपूर्व जामीन नाकारला. अटकेनंतर मेहुल चोक्सीने २२ ऑगस्ट रोजी आणखी एक जामीन अर्ज दाखल केला. त्याने नजरकैदेत राहण्याची तयारी दाखवली. पण अपील न्यायालयाने नजरकैद करण्यासाठीचा अर्ज आणि जामीन अर्ज हे दोन्ही फेटाळले. यामुळे मेहुल चोक्सी तुरुंगात आहे.

गीतांजली समुहाचा मालक असलेल्या ६६ वर्षांच्या मेहुल चोक्सीच्या भारताकडे हस्तांतरण करण्याच्या याचिकेवर सप्टेंबरच्या मध्यात बेल्जियमच्या न्यायालयात सुनावणी होईल. मेहुल चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण व्हावे यासाठी सीबीआय आणि बेल्जियम समन्वय राखून एक मजबूत केस तयार करत आहेत. भारताला पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांना अटक करुन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायची आहे. आरोपींनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट प्रतिज्ञापत्रांद्वारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment