अनुराग आणि अभिनव कश्यप दोघांचेही सलमानवर आरोप
मुंबई : २०१० मध्ये आलेल्या सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानसोबतच्या अनुभवाबद्दल एका मुलाखतीत स्पष्ट आणि परखड वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना, कश्यप यांनी सलमानवर कामाविषयी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की सलमान खानच्या अभिनयात कधीच उत्साह नव्हता आणि तो आपल्या अभिनयाबाबत फारसा गंभीरही नव्हता. कश्यप म्हणाले, "सलमान कधीही कामात पूर्णपणे सहभागी होत नाही. त्याला अभिनयात आजिबात रस नाही, तो शूटिंगला येतो, हे तो स्वतःवर उपकार करतो . त्याचं लक्ष सेलिब्रिटी इमेजवर जास्त असतं, अभिनयावर नाही."
अभिनव यांनी सलमानला "असभ्य" आणि "गुंड" असंही संबोधलं. त्यांनी आरोप केला की खान कुटुंब बॉलीवूडमध्ये वर्चस्व ठेवतं आणि त्यांच्या विरुद्ध कोणी गेलं, तर ते सूड घेतात. "सलमान एक फिल्मी घराण्यातून येतो आणि ते लोक सगळ्यावर नियंत्रण ठेवतात. जर कोणी त्यांच्या विरोधात गेला, तर ते त्याच्याविरुद्ध कारवाई करतात," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
अनुराग कश्यपलाही आले होते असेच अनुभव
अभिनव यांनी सांगितले की त्याचा भाऊ, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यालाही याच प्रकारचा अनुभव ‘तेरे नाम’च्या वेळी आला होता. "दबंगपूर्वीच अनुरागने मला सांगितलं होतं की तू सलमानसोबत चित्रपट करू शकणार नाहीस. पण त्यावेळी त्याने मला सविस्तर काही सांगितलं नाही. त्याला माहिती होतं की मला त्रास दिला जाईल, कारण तो या गिधाडांना ओळखतो," असं अभिनव म्हणाले.
त्यांनी हेही उघड केलं की ‘तेरे नाम’ची पटकथा अनुरागने लिहिली होती, पण नंतर त्याला प्रोजेक्टमधून बाजूला केलं गेलं आणि त्याला योग्य श्रेयही दिलं नाही. "बोनी कपूरने त्याच्याशी गैरवर्तन केलं आणि नंतर त्याला चित्रपटातून काढून टाकलं," असं त्यांनी नमूद केलं.
अनुराग कश्यपचा खुलासा २०२३ मध्ये
२०२३ मध्ये अनुराग कश्यपने 'अनफिल्टर्ड बाय समदीश' या शोमध्ये हे स्पष्ट केलं होतं की त्याला एका मोठ्या अभिनेत्याला दिलेल्या सल्ल्यामुळे प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. त्याने सांगितलं, "मी नायकाला त्याच्या छातीवर वॅक्स लावू नका, असं सांगितलं, आणि त्यामुळं मला त्या चित्रपटातून हटवण्यात आलं." असं ते म्हणाले .






