मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने येतात. मुंबई शहरातील सर्वात श्रीमंत गणपती असलेले हे मंडळ देणगीच्या बाबतीत, लालबागच्या राजाला देखील मागे टाकतो. यंदाच्या गणेशोत्सवात जीएसबीच्या दानपेटीत विक्रमी १५ कोटींची देणगी जमा झाली आहे, जी लालबागच्या राजाच्या देणगीपेक्षा खूपच जास्त आहे.
मुंबईचा सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या तुलनेत, जीएसबी गणेश मंडळाच्या दानपेटीत यंदा १५ कोटीची देणगी जमा झाली आहे. यावर्षी सुमारे तीस लाख भाविकांनी जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले, तसेच त्याच्या सेवांमध्ये भाग घेतला आणि मोफत अन्नदान सेवेचा लाभ देखील घेतला.
मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ असलेल्या जीएसबी सेवा मंडळाची यावर्षी अनेक कारणांमुळे जास्त चर्चा झाली. या मंडळाने यावर्षी तब्बल ४७४.६४ कोटी रुपयांचा विक्रमी विमा उतरवला. शाडू मातीपासून बनवलेल्या या गणेश मूर्तीला यावर्षी ६९ किलोपेक्षा जास्त सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित करण्यात आले होते. ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जीएसबीला भाविकांची सर्वाधिक गर्दी झाली.
यावर्षी जमा झालेली देणगी
जीएसबीला यावर्षी मिळालेली देणगी अंदाजे १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. "बँका, विमा कंपन्या आणि कॉर्पोरेट्स त्यांचे योगदान देतात आणि आम्हाला प्रायोजित करतात," असे जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. गणेशोत्सवात केलेल्या विविध सेवांमधून भाविकांनी दिलेल्या देणगीबरोबरच रक्कमही गोळा करण्यात आली. "जीएसबी सेवा मंडळात सुमारे ४०,००० हवन ; ६,००० तुळभरा आणि एकूण ९३,५०० पूजा करण्यात आल्या आणि दररोज २०,००० हून अधिक लोकांना अन्नप्रसाद देण्यात आला ," असे देखील ते पुढे म्हणाले.