Monday, September 8, 2025

उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू

उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३ मध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाला. बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे अश्विनी केदारी ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण २८ ऑगस्ट पासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर दहा दिवसांनी संपली. अश्विनी केदारी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या.

पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात अश्विनी केदारी यांच्यावर उपचार सुरू होते. पण गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांच्याकडून उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अश्विनी केदारी यांची दहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी भविष्यात जिल्हाधिकारी होता यावे म्हणून प्रशासकीय परीक्षेची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. पण भलतच घडलं. पहाटे अभ्यासासाठी उठलेल्या अश्विनी केदारी यांनी घोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता. अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोडा वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी जास्त गरम झालं होतं. हिटर बंद करुन बालदी उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनी केदारी पाय घसरुन पडल्या. या अपघातात त्यांचं शरीर ८० टक्के भाजले होते. गंभीररित्या भाजल्यामुळे वाचणे कठीण असल्याची जाणीव आधीच झाली होती पण डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. हे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा