Monday, September 8, 2025

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा
मुंबई: विलेपार्ले येथील डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सतत येणाऱ्या तक्रारींनंतर, बीएमसी प्रशासन अखेर कृतीत आले आहे. आता रुग्णालय व्यवस्थापनाने अनेक महत्त्वाची पावले उचलून रुग्णांना दिलासा देण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत अनेक बदल आणि  सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिन्यांपासून कुपर रुग्णालयातील, दवाखान्याची वेळ, स्वच्छता आणि औषधांचा तुटवडा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक तक्रार करत होती. वारंवार होत असलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दवाखान्याच्या वेळेत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. रुग्णांना लांब रांगेत थांबावे लागू नये म्हणून दवाखान्याचा वेळ ३ तासांनी वाढवण्यात आला आहे. तसेच, नोंदणी सहाय्यकांची संख्या वाढवून, ५ खिडक्यांवर नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

८५० तक्रारी निकाली काढल्या

गेल्या तीन आठवड्यात ८५० हून अधिक तक्रारी निकाली काढल्या गेल्याचे बीएमसी प्रशासनाचे म्हणणे आहे. यासाठी तीन सदस्यांची पर्यवेक्षी समिती स्थापन करण्यात आली आहे, जी रुग्णालयातील दैनंदिन कामावर लक्ष ठेवत आहे. समितीचे लक्ष औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावर आहे.

औषधे आणि उपकरणांच्या कमतरतेवर मार्ग

कूपर रुग्णालयात औषधे आणि आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आतापर्यंत ३५० कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. बीएमसीचा दावा आहे की आता कोणत्याही रुग्णाला औषधासाठी भटकंती करावी लागणार नाही. याशिवाय, उपचार प्रक्रिया जलद आणि सुरळीत व्हावी यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

उंदरांच्या समस्येवर स्वच्छता आणि नियंत्रण 

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या दोन ज्येष्ठ महिला रुग्णांचा उंदरांनी चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती केवळ नियमित स्वच्छतेवर लक्ष ठेवणार नाही तर रुग्णालयाच्या परिसरात उंदरांच्या समस्येवरही लक्ष ठेवेल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आता स्वच्छतेचे काम नियमित शिफ्टमध्ये केले जाईल आणि प्रशासनाकडून त्याचे थेट निरीक्षण केले जाईल. बीएमसी प्रशासनाने दावा केला आहे की रुग्णालयाचे कामकाज आता हळूहळू जुन्या स्थितीत परत येत आहे. नवीन व्यवस्था लागू केल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल. कूपर हॉस्पिटल हे मुंबईतील प्रमुख सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे जिथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत, रुग्णालय व्यवस्थापनाच्या नवीन उपक्रमामुळे रुग्णांच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >