
कोकणातील माणसे सुंदर कोकण सोडून शहरात आली ती नोकरीसाठी. मुलांना खाऊ घालण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी. मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात ही माणसे मोठी झाली. आईचं प्रेम आणि वडिलांची सावली सोडून गेल्यावर जशी अवस्था लेकराची होते तशीच काहीशी अवस्था कोकणातील माणसाची होत असेल हे नक्की. मुंबईत त्याचा जीव नेहमीच त्याच्या गावात गुंतलेला असतो. कोकणातील अनेक चाकरमान्यांनी आता परदेशही गाठलय. पण आजही गावची ओढ त्यांच्या हृदयात आहे. दरवर्षी गणपतीला चाकरमानी आणि कोकणातली लाल माती हे एकमेकांना जोडले गेले आहे. हेच नातं त्यांना वर्षातून एकदा तरी जवळ आणतं. आपल्या घरापासून लांब राहिलेल्या लेकराला तेवढ्याच आपुलकीनं कोकण आजही आपलस करतं. गावातून सुट्टी संपवून परतीचा प्रवास करताना ‘घराकडे लवकर येवा रे’ म्हणत ‘पोहोचल्यावर पत्र पाठव, सांभाळून प्रवास कर, जीवाला जप बाळा’ हे मायेचे बोल विसरता येत नाही.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये सण, उत्सव त्यांच्या-त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्वच सण, उत्सव साजरे केले जातात. कोकण हा नेहमीच सण, उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करणारा प्रांत आहे. कोकणात ग्रामदेवतेची यात्रा, मंदिरांचे जिर्णोद्धार, दिवाळी, दसरा, शिमगोत्सव त्यातही कोकणवासीय गणेशोत्सव मात्र वेगळ्या उत्साहाने साजरा करतात. गणेशोत्सवात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. या गणेशोत्सवात कोकणात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये येणारा नोकरी-व्यवसाय या निमित्ताने गावाबाहेर असणारा कोकणवासीय मात्र न चुकता गावात परततात. मुंबई ते कोकणचा त्यांचा प्रवास कितीही खडतर असला तरीही कोकणवासीय मात्र गावाकडे येतोच. पाच, सात आणि शक्य असेल, तर अकरा दिवस गावाकडील घरात गणेशमूर्ती आणून उत्सव साजरा करतो. मुंबईतून येणाऱ्या नोकरी करणाऱ्या अनेक कुटुंबातील मुंबईकरांना फार ओढाताण करून गावाकडे यावे लागते; परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करत मुंबईकर या गणपती उत्सवासाठी गावात येतोच.पूर्वीच्या पिढीतील अनेकांनी अतिशय कठीण काळातही गणपती उत्सवाला यायच कधी टाळले नाही. मात्र, कोकणात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार नाही. केवळ यामुळेच गावो-गावच्या अनेक कुटुंबातील गाववाले शहर गाठतात. आज अनेकांना शहरात रहाण नकोय; परंतु शेवटी कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे या एकाच कारणाने अनेकजण फार कष्टाचे, त्रासाचे जीवन असतानाही गाव सोडून शहरात काम करत असतात. दरवर्षी गावच्या घरात गणपती आणायचा आहे. त्यांच्या-त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार गणेशोत्सव साजरा करीत असतात. गणेशोत्सव झाला, गणपती विसर्जनानंतर कोकणाबाहेर नोकरीनिमित्ताने राहिलेल्या कोकणवासीय गावातून पुन्हा शहरांकडे जातो. अनेकांची घर बंद असतात. वर्षभरात जेव्हा कधी कोकणवासीय पुन्हा गावाकडे येतील तेव्हा गावातील घरं उघडत असत. इतरवेळी कोकणातील अनेक घर कुलूपबंद असतात. गावातील काही घरातून सुरकूतलेल्या चेहऱ्याचे वृद्ध गावात दिसतात. अनेक घरातून एखादी वृद्ध महिला किंवा वृद्ध दांपत्य गावातील घरात असतात. घरातील मुलगा, सून, नातवंड शहराकडे जायला निघाली की गणेशोत्सवाच्या आदल्यादिवशी मुलं घरी येणार म्हणून ज्या अमाप उत्साहाने मुलांच्या, नातवंडाच्या स्वागताला घरात असतात; परंतु पाच दिवसांनी, सात दिवसानंतर किंवा अकरा दिवसांनी गणपती विसर्जन झाल्यावर जेव्हा एखाद्या कुटुंबातील मुंबईकर नोकरी, व्यवसायावर हजर होण्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा घरातील वृद्धा ज्या आशेवर पुढच्यावर्षी लवकर ये गणपतीला सांगते अगदी त्याच भावनेतून आपल्या शहरात जाणाऱ्या मुलांना, नातवंडांना डोळयात आलेलं पाणी लपवत पदर तोंडाला लावत ‘घराकडे लवकर येवा रे’ म्हणून जेव्हा आई- मुलाला सांगते तेव्हा कोकणातून नोकरी व्यवसायासाठी घर सोडणारा मुलगाही आतून गलबलतो. पण त्याचा नाईलाज असतो. आईला चेहरा न दाखवता भावनिकतेने तो घर सोडतो.
शहरांच्या रोजच्या धबडक्यात तो इतका हैराण होतो. त्याला इच्छा असूनही वारंवार गावात येता येत नाही. मग गावातल्या घरांमध्ये वयोवृद्ध असतात. शेजारच्या घरातही जाण्या-येण्या एवढ्या स्थितीतही ते नसतात. मग फक्त जो कोणी गावात भेटेल त्याच्याशी भरभरून बोलणारी वृद्ध माणसं गावो-गावी फिरताना भेटतील बंद घर आणि वयोवृद्ध माणसं ही प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये दिसणारे दृश्य आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्यात येते. गणपतीच्या मूर्ती विसर्जनानंतर प्रत्येक घर सुनं-सुनं वाटत. गणपती घरामध्ये असताना घरातल वातावरण भारलेल असत. गणपती विसर्जनानंतर घर सुनंसुनं वाटत तसच घरातील कोकणवासीय मुंबई, पुणे शहराला निघाले की तसच वाटत असत. पंचवीस वर्षांपूर्वी गावातील एखाद्या वाडीतील कोणी मुंबईकर मुंबईला जायला निघाला की त्याला परतीच्या प्रवासाचा निरोप देण्यासाठी वाडीतील दहा-वीस जण तरी सोडायला जायचे. तस म्हटलं तर फार मोठी अपेक्षा काहीच नव्हती. कोणी काही देऊही शकत नव्हता. याच कारण शहरांमध्ये नोकरी करणारा कोकणवासीयाची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच होती.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर गावो-गावी हेच चित्र असायचे. रायगडमध्ये काही कारखानदारी आली. काही मोठे उद्योग आल्याने काही प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परंतु त्यात स्थानिक किती हा परत प्रश्न आहेच; परंतु तरीही काहींनी गावात रोजगार उपलब्ध झाला असला तरीही रायगड जिल्ह्यातील ही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील तरुण रोजगाराच्या शोधात शहरांमध्येच गेलेला दिसून येईल. अर्थात आजची विविध क्षेत्रात इंजिनीअर झालेले तरुण केवळ आपल्या कोकणात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्यांसाठी इथे उद्योग नाही. त्यामुळे ते शहरांकडे जात आहेत. त्यातल्या अनेकांना कोकणात राहूनच करिअर करण्याची इच्छा आहे. पण संधीच नाही. यामुळे केवळ नाईलाजाने गाव, घर सोडावे लागते. घरातील सुरकूतलेल्या आजी-आजोबांचा चेहरा त्या गावच्या तरुणालाही अस्वस्थ करतो. पण शेवटी नोकरी त्याला खुणावते आणि तो गाव सोडतो. प्रत्येक गावातून अनेक घर बंद आहेत. कोकणातील हे बंद घरांच्या दरवाजा आडून येणारे हुंदके अस्वस्थ करणारे आहेत. कोकणातील हे सारे चित्र लवकर बदलावे हिच कोकणवासीयांची अपेक्षा आहे. मंगलमुर्तीच्या उत्सवातले हे मंतरलेले, मंत्रमुग्ध करणाऱ्या दिवसाची शिदोरी घेऊन वर्षभराची ऊर्जा घेऊन कामाच्या गावी परतणाऱ्या परिवाराला खेड्याकडे चला असे सांगण्यासाठी तसे वातावरण तयार करायला हवे...
- संतोष वायंगणकर