
ढाका (वृत्तसंस्था) :
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ढाका येथील एका स्टेट बँकेची बराच काळ बंद असलेली तिजोरी उघडण्याचे आदेश दिले आहेत. ही तिजोरी ११७ वर्षांपूर्वी (१९०८) सील करण्यात आली होती. या तिजोरीत जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक असलेला 'दर्या-ए-नूर' हिरा असण्याची अपेक्षा आहे. तथापि, हा हिरा तिथे आहे की, नाही हे स्पष्ट नाही; कारण तो अनेक दशकांपासून दिसला नाही.
दर्या-एं-नूरला 'कोहिनूरची बहीण' म्हटले जाते. कोहिनूर सध्या ब्रिटनमध्ये आहे. दोन्ही हिरे भारतातून आणले गेले होते. सध्या दर्या-ए-नूरची किंमत सुमारे १३ दशलक्ष (सुमारे ११४.५ कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. दर्या-ए-नूर अजूनही बांगला देशात आहे का? हा प्रश्न आजही एक गूढच आहे. तो बांगलादेशच्या सोनाली बँकेच्या तिजोरीत असण्याची शक्यता आहे, जी कदाचित १९०८ पासून येथे बंद आहे. तिजोरी शेवटची १९८५ मध्ये उघडण्यात आली होती आणि तेव्हाच हिरा असल्याची पुष्टी झाली होती; परंतु, २०१७ मध्ये, हिरा गायब झाल्याच्या बातम्या आल्या. तथापि, सोनाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी कधीही हिरा पाहिला नव्हता. ढाक्याचे नवाब सलीमुल्लाह यांचे पणतू ख्वाजा नैम मुराद यांनी एएफपीला सांगितले की, त्यांना हिरा पाहण्याची आशा होती.
याबाबत नवाबचे पणतू म्हणाले की, तो १०८ इतर खजिन्यांसोबत ठेवण्यात आला होता. नैम मुराद म्हणाले, 'ही परिकथा नाही. हा हिरा आयताकृती आहे आणि त्याच्याभोवती अनेक लहान हिरे आहेत.' त्यांच्या मते, हा हिरा सोने-चांदीची तलवार, हिऱ्याने जडलेली फेज (टोपी) आणि फ्रेंच राणीचा स्टार ब्रोच यासह १०८ इतर खजिन्यांसह तिजोरीत ठेवण्यात आला होता.