
बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी न्यायालयाजवळ भटक्या कुत्र्यांनी महिलेवर जीवघेणा हल्ला केला. होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार मुले आणि एक वृद्ध जखमी झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी केली आहे. तर नागरिकांनी भूतदयेपोटी कुत्र्यांना खाण्यापिण्यास घालणे थांबवले आणि परिसर स्वच्छ ठेवावा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अनेक कुत्रे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यात अन्न पाणी शोधतात. काही नागरिक वेगवेगळ्या कारणांमुळे सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊपिऊ घालतात. यामुळे रस्त्यांवरचा मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत जातो. या भटक्या कुत्र्यांमुळेच नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
गुब्बी न्यायालयाजवळ भटक्या कुत्र्याने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. पीडित महिलेचे नाव गंगुबाई (३५) असे आहे. ती तिप्तूर तालुक्यातील बीरसंद्रा गावातील रहिवासी होती. ती एका कौटुंबिक वादाच्या खटल्यात न्यायालयात आली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गंगुबाई न्यायालयाच्या आवारातील स्वच्छतागृहातून बाहेर आल्या आणि भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करताच दचकलेल्या गंगुबाई यांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून स्थानिक मदतीसाठी आले. स्थानिकांनीच गंगूबाई यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण दिले. यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्याचा पाठलाग केला आणि त्याला ठार मारले. जखमी महिलेला प्रथम प्राथमिक उपचारासाठी गुब्बी तालुका रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर बंगळुरू येथील मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
कर्नाटकमधील दावणगेरे जिल्ह्यातील . होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार मुले आणि एक वृद्ध जखमी झाले. जखमींवर शिवमोगा मॅकगॅन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे.