
मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाटा पॉवरच्या हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायरचा शोक लागल्याने ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, विसर्जनासाठी जाणारा गणपती मंडप विजेच्या तारेच्या अगदी जवळ आल्याने हा अपघात झाला. या दरम्यान, विजेचा जोरदार धक्का लागून ६ जण भाजले. अपघातानंतर लगेचच सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी ५ जणांना साकीनाका येथील पॅरामाउंट हॉस्पिटलमध्ये आणि एकाला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या अपघातात विनू शिवकुमार नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याचवेळी, उर्वरित ५ जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांच्यावर पॅरामाउंट हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे
तुषार गुप्ता (१८)
धर्मराज गुप्ता (४४)
आरुष गुप्ता (१२)
शंभू कामी (२०)
करण कनोजिया (१४)
१८,००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन
मुंबईत काल जल्लोषात १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शनिवारी अनंत चतुर्दशीला, ऐन पावसात, ढोल-ताशे आणि गुलाल उडवतलोकांनी आपापल्या बाप्पाला निरोप दिला. एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री ९.० वाजेपर्यंत मुंबईतील विविध जलाशयांमध्ये १८,००० हून अधिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर जलस्रोतांवर गणेशमूर्त्या विसर्जनासाठी नेले जात असताना, त्यांची झलक पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर, झाडांवर आणि खांबांवर बसलेले दिसले.