
मुंबई: मुंबईतील समुद्रकिनारे (चौपाटी) तसेच नैसर्गिक स्थळं आणि २९० पेक्षा अधिक कृत्रिम तलावांच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले अचूक नियोजन; मुंबई पोलीस दलासह अन्य शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य तसेच सर्व सार्वजनिक मंडळे, श्रीगणेश भक्त आणि नागरिक यांची साथ यामुळे अनंत चतुर्दशी निमित्त श्रीगणेश मूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. याबद्दल, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मार्गदर्शक तत्वे याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव २०२५ संदर्भात योग्य नियोजन आखून सर्व तयारी करण्यात आली होती. या तयारीला सर्व सार्वजनिक मंडळाकडून, श्रीगणेश भक्तांकडून प्रतिसाद लाभावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली होती.
रविवार, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदा श्रीगणेशोत्सवात एकूण १ लाख ९७ हजार ११४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ८१ हजार ३७५ घरगुती तर १० हजार १४८ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती तसेच गौरी आणि हरतालिका मिळून ५ हजार ५९१ मूर्ती समाविष्ट आहेत. महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणजे मुंबईतील श्रीगणेशभक्तांनी पर्यावरणपूरकतेचा अंगीकार करत कृत्रिम तलावांत मूर्ती विसर्जनाला सर्वाधिक प्राधान्य दिले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगणेशोत्सवात नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या.
श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून सुमारे १० हजार मनुष्यबळ अविरतपणे कार्यरत होते. ७० नैसर्गिक स्थळं व सुमारे २९० पेक्षा अधिक कृत्रिम तलाव, छोट्या मूर्ती विसर्जनासाठी ६६ जर्मन तराफे, चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून १२०० हून अधिक स्टील प्लेट, २ हजार १७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी, ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहने, विभागीय समन्वयासाठी २४५ नियंत्रण कक्ष, सुरक्षा देखरेखीसाठी १२९ निरीक्षण मनोरे, विसर्जनस्थळी ४२ क्रेन, २८७ स्वागत कक्ष, २३६ प्रथमोपचार केंद्र व ११५ रुग्णवाहिका, रात्रीच्या विसर्जनासाठी ६ हजार १८८ प्रखर प्रकाशझोताचे दिवे (फ्लडलाईट्स) व १३८ शोधकार्यासाठीचे दिवे (सर्चलाईट्स), १९७ तात्पुरती शौचालये, आपत्कालीन तयारीसाठी अग्निशमन दलाचे वाहन आदी सोयी-सुविधा अखंडपणे पुरवल्या होत्या.
यावर्षी महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून व्यापक जनजागृती करण्यात आली.
मुंबईतील श्रीगणेशोत्सवात यंदा एकूण १ लाख ९७ हजार ११४ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये १ लाख ८१ हजार ३७५ घरगुती तर १० हजार १४८ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती तसेच गौरी आणि हरतालिका मिळून ५ हजार ५९१ मूर्ती समाविष्ट आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी केलेल्या जनजागृतीला यंदा मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे कृत्रिम विसर्जनस्थळांवर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ यंदा वाढला.
दिवसनिहाय श्रीगणेशमूर्ती विसर्जन
दीड दिवस - ६० हजार ४३४
पाच दिवस - ४० हजार २३०
सात दिवस - ५९ हजार ७०४
अकरा दिवस - ३६ हजार ७४६
एकूण - १ लाख ९७ हजार ११४
अकराव्या दिवशी विसर्जन झालेल्या एकूण श्रीगणेशमूर्ती-
(७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची आकडेवारी)
सार्वजनिक - ५ हजार ९३७
घरगुती - ३० हजार ४९०
हरतालिका / गौरी - ३१९
एकूण - ३६ हजार ७४६
अकरा दिवसांत गौरी आणि हरतालिका मिळून ५ हजार ५९१ मूर्ती विसर्जित
श्रीगणेशोत्सवादरम्यान ५०८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित-
मुंबईतील श्रीगणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांचे संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक मंडळांकडून योग्यप्रकारे निर्माल्य संकलित केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण ५०८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.