Friday, September 5, 2025

कोकणातील घरफोड्या थांबणार कधी?

कोकणातील घरफोड्या थांबणार कधी?

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून विविध ठिकाणी घरफोड्या होत आहेत. त्या अजूनही थांबलेल्या नाहीत. जिल्ह्यात होणाऱ्या घरफोड्या थांबणे गरजेचे आहे. ज्या तालुक्यात किंवा गावात चोरी झाली असेल त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन खाकीवर्दीला मदत करण्याचे आवाहन करणे. ज्याठिकाणी पोलीस बळ कमी पडत असेल त्याठिकाणी स्थानिक नागरिकांमधून मानधनावर स्वयंसेवक नेमणे म्हणजे चोरट्यांना पकडणे अधिक सुलभ होईल. मात्र तो आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करणार नाही याची खात्री करावी लागेल. केवळ जिल्ह्यात नव्हे तर इतर ठिकाणी होणाऱ्या घरफोड्या थांबण्यास मदत होईल.

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागामधील जिल्ह्यांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून विविध ठिकाणी घरफोड्या होत आहेत. त्या अजूनही थांबलेल्या नाहीत. तसे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा घरफोड्या झाल्याचे वर्तमानपत्रांत वाचायला मिळतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. काही वेळा संशयित म्हणून पकडले गेले, त्याचप्रमाणे इतर राज्यांमधून सुद्धा पकडून आणण्यात आले असे स्थानिक वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळते. मात्र त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. दिवसेंदिवस होणारी घरफोडी ही पर्यटन जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. तेव्हा जिल्ह्यातील घरफोड्या थांबणे गरजेचे आहे. आतापर्यंत काही उपाययोजना करण्यात जरी आल्या असल्या तरी जिल्ह्यातील घरफोड्या थांबविता आलेल्या नाहीत. घरफोडी झाल्यावर चोरटे सराईत गुन्हेगार असल्याची मात्र जोरदारपणे चर्चा होत असते. तेव्हा आरोपींना अटक करण्यात आले तरी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीरपणे कारवाई होणे आवश्यक आहे. म्हणजे कोणी बंद घरफोडण्याच्या नादाला लागणार नाही. काही वेळा एका रात्रीत आठ बंद घरे फोडण्यात आलेली होती. त्यामुळे आता खाकी वर्दीला एकप्रकारे आवाहन दिल्यासारखेच आहे. अशावेळी स्थानिक रहिवाशांनी सुद्धा जागृत राहिले पाहिजे. आपल्या गावात किंवा वाडीमध्ये अनोळखी व्यक्तींचा वावर आहे का? त्याचप्रमाणे गावच्या पोलीस पाटलांनी करडी नजर ठेवली पाहिजे. कारण पोलीस पाटील हे स्थानिक रहिवासी असून त्यांना गावची पूर्ण माहिती असते.

खरे म्हणजे, चोरट्यांचे लक्ष बंद घरे फोडण्याकडे असते. तसेच ते येणा-जाणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवतात. त्यामुळे त्यांना गुपचूप घर फोडणे शक्य होते. त्यातील सोने-चांदी अशा मौल्यवान वस्तूंची चोरी करणे. त्यात रोकड पैशांवर डल्ला मारणे. देवळातील घंटा लंपास करणे आणि काहीच मिळाले नाही तर कोंबड्या सुद्धा पळविणे हे चोरांसाठी सर्रास झाले आहे. इतकेच नव्हे तर गाव कुसाबाहेर असलेल्या शाळेत सुद्धा सुट्टीच्या दिवसांत दरवाजाचे टाळे फोडून शाळेतील वस्तू पळवून नेलेल्या आहेत. अलीकडे तर सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून गजबजलेल्या वस्तीमधील सोन्या-चांदीचे ज्वलर्स सुद्धा लुटू लागले आहेत. म्हणजे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यामुळे आता केवळ खाकी वर्दी नव्हे तर नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे.

आता आपण जिल्ह्यात घरफोड्या ज्या होत आहेत त्या का होत आहेत याची कारणे शोधणे आवश्यक आहे. तरच त्यावर योग्य उपाययोजना करता येतील. जिल्ह्यातील बेकारांचा जरी विचार केला तरी जे संशयित चोर म्हणून पकडण्यात आलेले आहेत, त्या चोरांची नावे व त्यांच्या पत्त्यांचा विचार करता हे चोर जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे हातांना काम नसल्यामुळे असे बेकार लोक चोरीचा मार्ग स्वीकारतात. याचे प्रमुख कारण म्हणजे गरिबी होय. आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार मिळत नाही. मिळाला तरी हंगामी, तो सुद्धा अपुरा. आपल्या कुटुंबाचा खर्च चालविणे त्यांना शक्य नसते त्यामुळे त्यांच्याजवळ काहीच पर्याय शिल्लक नसतो. शेवटचा पर्याय म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन लोक चोरी करताना आढळून येत आहेत. यात कामधंदा नसल्यामुळे अनेक लोक व्यसनाधीन झालेले दिसून येत आहेत.

लोकवस्ती विखुरलेली आणि पोलीस बळ कमी असल्यामुळे बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा कमी पडते. याचा परिणाम काही ठिकाणी घर फोडणे सोपे जाते. तसेच आजूबाजूला जंगल व पायवाट असल्याने दडून बसने किंवा पळून जाणे चोरट्यांना सहज सोपे होते. त्यासाठी चोरटे टेहळणी करतात असा स्थानिक लोकांचा संशय आहे. तेव्हा पोलिसांनी सुद्धा स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपला बंदोबस्त चोख ठेवावा. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी नाकेबंदी करावी. गावातील खबऱ्यांकडून माहिती घ्यावी. तसेच संशयित ठिकाणी गस्त वाढवावी. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच ते सुरू असल्याची खात्री करावी. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या तालुक्यात किंवा गावात चोरी झाली असेल त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन खाकीवर्दीला मदत करण्याचे आवाहन करणे.

ज्याठिकाणी पोलीस बळ कमी पडत असेल त्याठिकाणी स्थानिक नागरिकांमधून मानधनावर स्वयंसेवक नेमणे म्हणजे चोरट्यांना पकडणे अधिक सुलभ होईल. मात्र तो आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करणार नाही याची खात्री करावी लागेल. केवळ जिल्ह्यात नव्हे तर इतर ठिकाणी होणाऱ्या घरफोड्या थांबण्यास मदत होईल. केवळ घरफोड्या झाल्या म्हणजे सोने, चांदी व रोकड रक्कम गेली इतकेच नुकसान झाले असे म्हणता येणार नाही. चोरी झाल्यास ज्या वर्षी सोने किंवा चांदी खरेदी केलेले असेल त्यावेळच्या दराने पोलीस स्टेशनला नोंद केली जाते. नंतर चौकशी सुरू होते. तो भाग वेगळा मात्र त्यामुळे घर मालकाला मानसिक धक्का सहन करावा लागतो. चोरी जरी झाली तरी घराचा दरवाजा फोडला जातो. घरातील फर्निचर व कपाट फोडले जाते. मात्र त्याची नोंद पोलीस स्टेशनला केली जात नाही.

थोडक्यात असे म्हणता येईल की, घरफोड्या जिल्ह्यातील किंवा परजिल्ह्यातील असोत त्यांच्या रिकाम्या हातांना काम दिले गेले पाहिजे. म्हणजे नागरिक घरफोड्या करण्याचा विचार करणार नाहीत. हा प्रभावी उपाय जिल्ह्यातील घरफोड्या थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. तसेच योग्य ती कायदेशीर शिक्षा घरफोड्यांना करावी लागेल तरच कोकणातील घरफोड्या थांबतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज आहे.

- रवींद्र तांबे

Comments
Add Comment