Saturday, September 6, 2025

रूप गणेशाचे... व्रत संगीत साधनेचे..

रूप गणेशाचे... व्रत संगीत साधनेचे..
‘कलाधिपती’ म्हणून गणपतीचा वरदहस्त सर्व कलाकारांवर असतो. संगीतक्षेत्रही याला अपवाद नाही. या क्षेत्रातली मंडळी संगीत साधना करत गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेली असतात. कलेच्या माध्यमातून गणरायाची संगीतमय आराधना कलाकार मंडळींकडून वर्षभर सुरूच असते. आता गणरायाला निरोप देत असतानाच, संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या काही कलाकारांनी जागवलेल्या या आठवणी... गणपतीसोबत अतूट नाते... आमच्याकडे गणपती बसत असला तरी हा त्याचा कालावधी ठरावीक नसतो. दीड, पाच, दहा असे कितीही दिवस आमच्याकडे गणपती असतो. यंदा आमचा गणपती पाच दिवसांचा होता. गणेशोत्सवाबद्दल सांगायचे तर माझा पहिला कार्यक्रम गणपतीच्या दिवसांतच झाला होता. तेव्हा मी पहिल्या इयत्तेत होते; पण तेव्हापासूनच माझ्यातला कलाकार आणि गणपतीचे नाते अतूट बनले आहे. कलाकार मंडळींसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा असतो. अनेक कलाकार या काळात त्यांची कला सादर करत असतात. काही वर्षांपूर्वी ‘लालबागचा राजा’ असा सिनेमा आला होता आणि या सिनेमात माझे एक गाणे होते. विशेष म्हणजे त्याचे संगीत अनावरण लालबागच्या राजाच्या साक्षीने करण्यात आले होते. गणपतीच्या दिवसांतली ही आठवण माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे. - नेहा राजपाल (गायिका) चाळीतला आनंद सोहळा... गणपतीच्या दिवसांतली चाळ हा एक वेगळाच प्रकार असायचा. या दिवसांत चाळीत अपार उत्साह असायचा. आमच्या खांडके बिल्डिंगमधल्या घरात आमच्या अभ्यासासाठी तयार केलेल्या जागेत गणपतीसाठी एक कप्पा केला गेला होता. गणपतीच्या आगमनापूर्वी तिथे आकर्षक आरास केली जायची. गणपती आल्यावर आमचे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी गणपती दर्शनाला घरी यायची. घरात गणपती बाप्पा विराजमान झाले की एक वेगळेच चैतन्य अनुभवायला मिळायचे. आरत्या म्हणणे हा विशेष आनंदाचा भाग असायचा आणि त्याचबरोबर गणपतीच्या प्रसादातल्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेणे, ही पर्वणी असायची. गणपतीतल्या दिवसांतली चाळ म्हणजे एक प्रकारचा आनंद सोहळा असायचा. - कमलेश भडकमकर (संगीतकार) पर्यावरणपूरक उत्सव... आमच्याकडे गौरी-गणपती असतात. गणेश चतुर्थीच्या बरेच दिवस अगोदर आमच्याकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. गणपतीच्या दिवसांत घर आणि माझे कार्यक्रम असे सर्वकाही एकत्र सुरू असते. बाहेरचे माझे कार्यक्रम आणि घरी गणपती-गौरींसाठी सुरू असलेली लगबग याचा योग्य ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सुरू असतो. गौरी-गणपतीमुळे घरातले वातावरण प्रसन्न झालेले असते आणि त्यामुळे काम करण्यास अधिक उत्साह येतो. आमचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असतो. गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची असते आणि सभोवतालची आरासही पर्यावरणाचे भान राखून केलेली असते. गणपतीत घरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी येतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. चतुर्थीच्या दिवशी उकडीचे मोदक करण्याची जबाबदारी माझ्यावर असते आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असते. - मधुरा देशपांडे (गायिका) गणपती दर्शनाची ओढ... ‘गणपती बाप्पा मोरया’ असे ओरडण्याचे, आरत्या म्हणण्याचे आणि मोदकांवर आडवा हात मारायचे दिवस म्हणजे गणेशोत्सवाचे...! बालपणी आम्ही हे सर्वकाही उत्साहात करत असायचो. मुंबईत लालबागला माझा एक मामा राहत असे आणि गणपतीच्या दिवसांतले लालबाग मला त्यावेळी अनुभवता आले. या दिवसांत आम्हा मुलांचा मुक्काम मामाच्या चाळीतल्या खोलीत असायचा. गणपतीत आम्ही दिवसभर पायाला भिंगरी लागल्यासारखे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती बघायला भटकायचो. उंचच उंच मूर्ती, मंडळांनी उभारलेले देखावे आणि सजावट पाहणे हा आमच्या आनंदाचा भाग होता. गणपती हा माझा अतिशय आवडता आणि त्याला ‘बाप्पा’ म्हणून संबोधताना मला तो मित्र म्हणूनच अधिक जवळचा वाटतो. - माधव विजय (संगीतकार) निसर्गमय गणपती... गणेशोत्सवाच्या दिवसांतली माझी बालपणीची आठवण सुखावणारी आहे आणि ती म्हणजे आमच्या घरी गौरी आल्या की, मला सुद्धा हवा तसा साजशृंगार करण्याची संधी मिळत असे. माझ्या सासरी सुद्धा गौरी-गणपती असल्याने, लग्नानंतरही या उत्सवात खंड पडलेला नाही. गौरी घरी आल्यावर विविध प्रकारचे खेळ आम्ही खेळतो. आमचा बाप्पा आणि त्याच्यासाठी केली जाणारी सजावट पर्यावरणपूरक असते. काही वर्षांपूर्वी गणपतीत आम्ही वारली पेंटिंगची सजावट केली होती. आमच्या गणपतीचे रूप निसर्गाशी साधर्म्य साधणारे म्हणजे ‘ट्री गणेशा’च्या स्वरूपातले असते. आमच्या गणपतीचे विसर्जन घरीच केले जाते. मूर्ती पाण्यात विरघळल्यावर ती माती कुंडीत भरली जाते आणि त्यात रोप लावले जाते. अशाप्रकारे उत्सव आणि निसर्ग याची सांगड आम्ही गणेशोत्सवात घालत असतो. - संपदा माने (गायिका-अभिनेत्री) वर्षभराची ऊर्जा... संगीताचे कार्यक्रम आणि गणेशोत्सव हे माझ्या आयुष्यातले घट्ट समीकरण आहे. अगदी गावांपासून परदेशापर्यंत मी गणपतीच्या दिवसांत अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे अनेक मानाच्या गणपतींचे दर्शन मला घेता आले. आमच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो आणि बाप्पाचे आमच्या घरातले अस्तित्त्व म्हणजे आमच्यासाठी भक्तीचा सोहळा असतो. बाप्पा घरी असतो तेव्हा घरात उत्साह पसरलेला असतो. पण जेव्हा त्याच्या विसर्जनाची वेळ येते; तेव्हा हुंदका दाटून येतो. पण तरीही, पुढच्या वर्षी लवकर येईन, असे आश्वासन देत तो वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. - त्यागराज खाडिलकर (गायक-संगीतकार)
Comments
Add Comment