
खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल
महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठ्या प्रमाणावर जादा बसेसची व्यवस्था केली आहे. महाड आगारातून फक्त महाड–पनवेल या मार्गावर तब्बल ९२ ते ९३ बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या अतिरिक्त फेऱ्यांसाठी ग्रामीण भागातील नियमित एसटी सेवा बंद केल्याने महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्याच्या खेडोपाड्यातील प्रवाशांचे हाल झाले आहेत.
महाड, पोलादपूर व गोरेगाव या ठिकाणी खरेदी, शिक्षण तसेच वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक दररोज ये-जा करतात. पण सध्या एसटी सेवा बंद असल्याने या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मिनिडोअर किंवा इतर प्रवासी वाहने महाग पडत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून, वेळेचाही अपव्यय होत आहे.
याशिवाय नुकताच लाखपाले–माणगांवदरम्यान झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे मिनिडोअरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांना वळणावळणाच्या टोळमार्गे जावे लागले आणि परिणामी प्रवासाचा कालावधी तसेच खर्च वाढला. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद असल्याबाबतचे फलक महाड परिवहन स्थानकात लावण्यात आले असून, यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. अशा काळात ती बंद करून जादा बसेस केवळ मुंबई-पुणे मार्गावर सोडल्याने ग्रामीण प्रवाशांना मात्र डोकेदुखी ठरत आहे.