
मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना मीरा-भाईंदर पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी थेट हैदराबादमध्ये छापेमारी करून तब्बल १२ हजार कोटी रुपयांची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. तेलंगणातील चेरापल्ली येथे ही गुप्त फॅक्टरी चालवली जात होती. या कारवाईत पोलिसांनी ३२ हजार लिटर कच्चे ड्रग्ज (रॉ मटेरियल) जप्त केले असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईची सुरुवात केवळ २०० ग्रॅम ड्रग्ज पकडण्यापासून झाली होती. पोलिसांनी या छोट्या सुगाव्यावरून तपास पुढे नेला आणि त्यांना थेट हैदराबादमधील या मोठ्या रॅकेटची माहिती मिळाली. त्यानंतर मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांच्या टीमसह हैदराबादमध्ये छापा टाकला आणि २५ लाखांच्या ड्रग्जपासून सुरू झालेल्या तपासाचा शेवट १२ हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या मोठ्या जाळ्याला उद्ध्वस्त करून झाला.
मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "गुन्हे शाखेच्या युनिटने एका महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर हे मोठे यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फॅक्टरीचा मालक, एक केमिकल ॲनालायझर आणि एक विदेशी नागरिक यांचा समावेश आहे." या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कारवाईचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.