मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही संकल्पना, आधी हेच नाटक उभे केल्यामुळे जशा पक्क्या होत्या, तशाच त्या अभिजीतने हे नाटक कधीही बघितले नसल्याने त्याच्याही डोक्यात पक्क्या होत्या. त्याला घाशीरामच्या साऱ्या परंपरा मोडायच्या होत्या आणि मी पारंपरीक नाट्यबाजातून बाहेर पडूच शकत नव्हतो. (या लेखात घासीराम आणि घाशीराम असे दोन शब्दप्रयोग आढळतील, जेव्हा घाशीराम असा उल्लेख येईल तेव्हा तो मराठी नाटकासंबंधी आणि घासीराम असा उल्लेख हिंदी नाटकाबाबत आहे असे समजावे.) तर सांगायचा मुद्दा हा की, अभिजीतने घासीराम आणि घाशीराम बघितलेलेही नव्हते. कधी काही संदर्भ कानावर पडले असतील तेवढीच नाटकाविषयीची इंन्फर्मेशन. बाकी डिटेल अभ्यास वगैरे माझ्यापाशी होता आणि जो होता तो तौलनिक (दोन भाषांतील तुलनात्मक) होता. वर म्हटल्याप्रमाणे अभिजीतला तुलना असो वा परंपरा मोडायच्या म्हटल्यावर मोडायच्या या ठाम निर्णयाप्रत येऊन त्याने कामाला सुरुवातही केली होती. परंपरा तोडायला माझी ना नव्हती; परंतु ते तुटताना बघण्याच्या आघातांमुळे मी कन्व्हिसच होत नव्हतो. सुरुवातच झाली ती संजय मिश्रांच्या कास्टिंगपासून. मराठीत मोहन आगाशे ते माधव अभ्यंकर अशी साधारण एकाच शरीरयष्टीच्या व्यक्तिरेखा नाना फडणीसांच्या भूमिकेसाठी निवडल्या गेल्या होत्या. माझ्यादेखील हिंदी नाटकात मी केलेला प्रदीप कबरेंचा विचार हा आधीच्या व्यक्तिरेखांशीच असलेला समविचार होता. प्रदीप कबरे यांचा अनुनासिक नैसर्गिक आवाज तर चितपावन ब्राह्मणी भूमिकेला अधोरेखित करणारा होता आणि तो इतर आधीच्या भूमिका केलेल्या नटांप्रमाणे खोटा (मुद्दाहून काढलेला) अजिबात नव्हता. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना हिंदीतल्या नाना फडणीसांची (प्रदीप कबरेंची) भूमिका अधिक आवडल्याचे दाखले अद्यापही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. संजय मिश्रांच्या अभिनयाबाबत प्रश्नच नव्हता. मसान, आखों देखी आणि वध हे त्यांचे तीनही चित्रपट म्हणजे माझ्या दृष्टीने अभिनयाची कोठारं आहेत; परंतु त्यांच्या डोळ्यांत दिसणारा ‘असहाय्यतेचा’ भाव प्रेक्षकांना पटेल का? हा माझ्या डोक्यातला प्रश्न होता. शिवाय संजय मिश्रा अत्यंत नैसर्गिक आंगिक आणि वाचिक अभिनयाचे गुणदर्शन करणारा नट आहे. आणि गेल्या ३०/३५ वर्षांच्या कालावधीत तर त्यांची अभिनय क्षमता अधिकच प्रगल्भ झाल्याचे जाणवते. त्यांच्या आवाजातला खर्ज मला पटत नव्हता जो नानांच्या भूमिकेशी पूर्णतः फारकत घेणारा होता. शिवाय ती भूमिका स्टाईलाज्ड असावी अशी मनोधारणा मी घट्ट कवटाळून बसलो होतो. त्यामुळे अभिजीतच्या आणि माझ्या चर्चेत माझ्या नकारात्मक शंकांच्या बोळ्यामुळे पाणी वहातं होत नव्हतं आणि असाच एक तिढा निर्माण झाला. नाना फडणीसांच्या लग्नात १४ वर्षांच्या नववधूला आपण बेबी फ्रॉकमध्ये पेश केली तर? मला अर्थातच हे काही पटत नव्हतं. "अरे निदान परकर-पोलक्याचा तरी विचार कर...!" "मी परंपरा मोडायच्या ठरवल्यावर कुणाचेच ऐकणार नाही, अरे समोरचा प्रेक्षक हिंदी आहे, मराठी नाही. मराठी रितीरीवाज त्याना माहीत नाहीत. ते दाखवायचे म्हणजे डिटेल्सही दाखवणे आले, मी प्रेझेंटेशनचा चेहरामोहरा अगदी पार बदलून टाकतोय. एकही प्रॉपर्टी नाटकात असणार नाही. केवळ असेल तो नानांनी घासीरामला दिलेला आसूड आणि त्यालाही भारतीय तिरंगी ध्वजाचे तीन रंग असतील.." ही अभिजीतची नवनाट्य संकल्पना मी मग नाटकाच्या एखाद्या ईझमशी, एखाद्या स्टाईलशी (स्टाईल याचा अर्थ इथे रिती, पद्धती आणि शैली या तीनही सूत्रांशी निगडीत आहे.) पडताळून पाहात होतो. कधी शैली आणि इझमचा मेळ बसायचा तर पद्धतीचे जमत नसे. कधी-कधी नाटकाच्या पद्धतीचा विचार इझमशी फारकत घेणारा ठरे. कालांतराने मात्र मी अशा एका अनुमानाला येऊन पोहोचलो की ही नाट्याकृती ना अॅब्जर्डीझमशी मेळ खाते, ना ब्रेक्ख्तियन शैलीशी. एक नवा इझम आणि रिती, पद्धती आणि शैली आपण नाट्यक्षेत्राला देऊ शकत नाही का? आणि जर याचे उत्तर ‘हो देऊ शकतो’ असे सकारात्मक असेल तर ‘घासीराम कोतवाल’ हे त्यावर अजून पन्नाशीही न उलटलेल्या अभिजीतच्या पिढीचे उत्तर आहे. कदाचित त्याचे सैद्धांतिक रूप आमच्या सारख्यांना म्हणजे आधीच्या पिढीला तयार करावे लागेल. पक्ष, साध्य, सिद्धता तयार आहे फक्त अनुमान तेवढे राहिलेय, ती आता आमची जबाबदारी आहे. असे प्रयोग नाट्यकर्मी करायला धजावताहेत हा फार मोठा बदल नाट्यक्षेत्रासाठी आहे असे मी मानतो. १८ व्या शतकापर्यंत ८ रस अभिनय संमत होते. १९ व्या शतकात ते ९ झाले. अभिनयाचा ४ अंगानी विचार व्हायचा. आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक बरोबर अगदी अलीकडे नाटककार प्रेमानंद गज्वींनी ‘तात्विक’ हा नवा अभिनयाधिष्ठीत विचार ९९ व्या नाट्यसंमेलनात मांडला. बाकी असे अनेक सैद्धांतिक बदल घडताहेत. त्याची दखलही घेतली जातेय; परंतु ते जागतिक पातळीवर विखुरले जावे कारण आपण आता ग्लोबल आहोत. हे विवेचन थोडं क्लिष्ट झालंय पण थोडं सोप्प करून सांगायचं तर, कालियामध्ये अमिताभ नाही का म्हणत ‘हम जहां खडे होते है, लाईन वहिसे शुरु होती है’ या नाटकाबाबतच्या इझम आणि शैली, पद्धतीचे तेच आहे. ‘हम जिस पद्धतीसे नाटक खेलते है, इजम वहिसे शुरू होता है...’ अभिजीत पानसेने असाच एक प्रयोग त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘रेगे’ या चित्रपटाच्या एडिट पॅटर्न बाबतीत चर्चिला गेला, त्याचे कौतुकही झाले; परंतु त्या प्रयोगाबाबतच्या अनुमानाचे काय? घासीरामचा प्रयोग मात्र पुढे जाणार, अगदी जागतिक पातळीवर...!

Comments
Add Comment

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे

दशावतारी कला वाढली पाहिजे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  दशावतार’ हा नवीन चित्रपट येत आहे. त्यामध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखविण्यास एक

रूप गणेशाचे... व्रत संगीत साधनेचे..

‘कलाधिपती’ म्हणून गणपतीचा वरदहस्त सर्व कलाकारांवर असतो. संगीतक्षेत्रही याला अपवाद नाही. या क्षेत्रातली मंडळी

डायरेक्टर्स ‘अ‍ॅक्टर’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  गोंडस, रुबाबदार असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिकेत विश्वासराव. ‘बेटर - हाफची लव

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागील लेखात घाशीराम कोतवालबाबतचा खराखुरा इतिहास पाहिला. इतिहास हा नाटक, कथा व

आईपणाचा सोहळा

आसावरी जोशी : मनभावन ती आरडओरडा करते. आक्रस्ताळेपणाने थयथयाट करते. तिचे ऐकले नाही की...! आई कशी असते? प्रेमळ, सोशिक,