नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व गणेशभक्त मग्न असणार आहे. यादरम्यान मुंबई, पुणे येथे गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढली जाते. त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर बाप्पाच्या दर्शनाला येणार आहे. पण यादरम्यानच हवामान खात्याकडून एक मोठी बातमी मुंबई, पुणे तसेच संपूर्ण राज्यासाठी आहे. ती म्हणजे आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस सहा, सात आणि आठ सप्टेंबर रोजी राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
दरम्यान आज सकाळपासून राज्यात ढगाळ वातावरण असून, मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपात पावसानं हजेरी लावली आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे धुळे नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.