
सोलार एक्सप्लोजिव्हज हा स्फोटके बनवण्याचा कारखाना आहे. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीचा हा कारखाना १९९५ पासून इथे कार्यरत आहे. इथे औद्योगिक क्षेत्राला लागणारी स्फोटके तर बनवली जातातच. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रासाठीदेखील स्फोटके बनवली जातात. २०२०-२१ च्या दरम्यान रिलायन्सचे मालक अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेले आरडीएक्स याच कारखान्यात बनल्याची चर्चा होती.
नागपूरपासून २५ किलोमीटरवर अमरावती रस्त्यावर असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्हजमधील 'क्रिस्टलायझेशन' इमारतीत बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. तेथे स्फोटकांना तांत्रिक पद्धतीने वाळवून त्यांचे स्फटिकीकरण सुरू होते. तेथे अचानक तापमान वाढले व स्फोट झाला. या स्फोटात ४० च्या वर कामगार जखमी झाले असून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. या स्फोटाच्या ज्वाळा दोन किलोमीटर वरूनही दिसत होत्या, तर आजूबाजूच्या सात किलोमीटरच्या परिसरातील खेड्यांमध्ये या स्फोटाचा हादरा पोहोचला होता. इतका हा स्फोट भीषण होता.
सोलार एक्सप्लोजिव्हज हा स्फोटके बनवण्याचा कारखाना आहे. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीचा हा कारखाना १९९५ पासून इथे कार्यरत आहे. इथे औद्योगिक क्षेत्राला लागणारी स्फोटके तर बनवली जातातच. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रासाठी देखील स्फोटके बनवली जातात. २०२०-२१ च्या दरम्यान रिलायन्सचे मालक अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेले आरडीएक्स याच कारखान्यात बनले होते अशी त्यावेळी चर्चा होती.
बुधवारी रात्री झालेल्या या स्फोटात ४० पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत, तर त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचेही कळते. सर्व जखमींवर नागपूरच्या दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे कळते. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यक्तींची देखील भेट घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील घटनास्थळी भेट दिल्याची बातमी आहे. याच कारखान्यात २०१८ मध्येही असाच गंभीर स्फोट झाला होता. गत दोन वर्षांत इथे पाच स्फोट झाले असून २१ कामगारांचा मृत्यू देखील झाला आहे. बुधवारी झालेला स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याच्या इमारतीच्या काँक्रीटचे तुकडे उडून साठ फुटांपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या अमरावती महामार्गावर जाऊन पडले. रात्रीच्या वेळी या महामार्गाने अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या जात असतात. जर त्यावेळी एखादी ट्रॅव्हल्सची गाडी तिथून जात असती तर अनेक प्रवाशांचा हकनाक जीव जाऊ शकला असता.
हादरे इतके जबरदस्त होते की, आजूबाजूच्या गावातील नागरिक घाबरून रस्त्यावर आले होते. हा स्फोट सोलारमध्ये झाल्याचे समजल्यावर त्या दिवशी तिथे रात्रपाळीत असलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी धावले. मात्र नेमके काहीच कळत नव्हते. त्यामुळे सर्व नातेवाइकांचा तिथे आक्रोश सुरू झाला होता. मग जखमींना नागपुरात हलवल्यावर नातेवाइकांनी देखील तिथेच धाव घेतली होती. इथे प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे संतप्त कामगारांनी काही काळ अमरावती मार्गावर रास्ता रोको देखील केला होता. शेवटी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, हा स्फोटकांचा कारखाना आहे. इथे वारंवार स्फोट होतात. तरीही इथले व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था का करत नाहीत? परवाचा स्फोट अनियंत्रित तापमानामुळे झाल्याची चर्चा सुरू होती.
आधी कारखान्यात एका खात्यात आग लागली. ती विझवण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र दरम्यानच्या काळात आग पसरून स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींनाही तडे गेले असल्याचे कळते. स्फोटाच्या वेळी काँक्रीटचा एक तुकडा उडून बाजूलाच असलेल्या कर्मचारी वसाहतीवर पडला. त्यावेळी वसाहतीच्या गच्चीवर काही कामगार झोपले होते. ते देखील जखमी झाले आहेत. या स्फोटात गणवीर नावाच्या सुपरवायझरचा मृत्यू झाला असून मृताच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे २५ लाखांची मदत करण्यात येईल असे जाहीर केले आहे. मात्र जखमींना देखील उपचाराच्या खर्चासह मदत केली जावी अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे. या कारखान्यात वारंवार होणारे स्फोट, त्यामुळे कामगारांचे होणारे मृत्यू यामुळे जनसामान्य चिंतेत आहेत.
- अविनाश पाठक