नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर उतरल्यामुळे विविध शंका-कुशंकांना तोंड फुटले आहे. ५ सप्टेंबरच्या पहाटे अमेरिकन हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर III हे मालवाहू विमान पाकिस्तानातील या महत्त्वाच्या लष्करी तळावर उतरले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये काही कट शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेची 'मदतीची' भूमिका
अधिकृत माहितीनुसार, अमेरिकेने पाकिस्तानमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली असल्यामुळे हे विमान तिथे उतरले. यामध्ये काही औषधे, गोळ्या आणि खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अमेरिकेचे इतके मोठे लष्करी विमान पाकिस्तानच्या एका प्रमुख हवाई तळावर उतरणे ही एक सामान्य घटना मानली जात नाही, म्हणूनच यामागे कोणताही छुपा अजेंडा असल्याचा संशय आहे.
नूर खान एअरबेसचे महत्त्व
पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे असलेला नूर खान एअरबेस हा पाकिस्तानी सैन्याचा एक महत्त्वाचा आणि धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील तळ आहे. यापूर्वी, भारताने पुलवामा हल्ल्यानंतर याच एअरबेसवर ड्रोन हल्ला केला होता. याच तळावरून पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ले करत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अमेरिकेचे विमान उतरणे हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफवरून संबंध ताणले गेले आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे विमान थेट पाकिस्तानमध्ये पोहोचल्यामुळे भारताने सावध भूमिका घेतली आहे आणि या संपूर्ण घडामोडींवर भारतीय लष्कराचे बारीक लक्ष आहे.