
आसावरी जोशी : मनभावन
श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे सगळे दिवस चांगलेच असतात हो श्याम... त्यांना उगाच शुभ-अशुभ ठरवू नये. माझाही यावर अगदी तंतोतंत विश्वास आहे. पण आजचा एक दिवस मात्र याला अपवाद ठरतो. एक प्रचंड हुरहूर घेऊनच हा दिवस उगवतो. किंबहुना तो कधी उगवावा असे वाटतच नाही.
आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस. दहा दिवस आपले मन;पूत लाड पुरवून घेऊन गणपती बाप्पा आपल्या घरी हिमवानाकडे कूच करतात. आपल्या मनाला चटका लावूनच... त्यादिवशीचे मोदक... जास्वंदीची फुले... काहीच मनास भावत नाही. उत्तरपूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींचे येणे नको वाटते आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना डोळ्यांत आसवे दाटतात. जी थांबायचे नावच घेत नाही.
हा आपला बाप्पा मला नेहमीच एक अत्यंत लाडावलेला, गुणी, निरागस बाळ वाटतो. त्याच्या आईच्या तर तो माथ्यावरच बसलेला आहे. पण त्याच्या भक्तगणांचाही तो अत्यंत लाडका आहे. ज्या घरी तो जातो ते घर त्याच्यासाठी काहीही... अगदी काहीही करायला तयार असते... लाडावलेले बाळ कसे आपल्या भोवतीच्या अनेक प्रलोभनांमध्ये सहज रमते आणि तात्पुरते आईला विसरते... किंवा मग एक डोळा आईवर ठेवून मन:पूत दंगामस्ती करत असते. त्याचप्रमाणे गणरायही हे दिवस आपल्या भक्तांसोबत पुरेपूर रमतात. त्यांच्या सुखदु:खात सामील होतात. पण आईला मात्र त्याचीच काळजी सतावत असते. आपले बाळ एकटे कसे येईल या विचाराने तीही माहेरपण अनुभवून बाळाला न्यायला पृथ्वीवर अवतरते. पण बऱ्याचदा हट्टी गणोबा मागाहून एकटेच येण्याचा हट्ट धरतात. पार्वती आईही आपल्या माहेरावर विश्वास ठेवून बाळाचा हट्ट पुरविते. काही बाळांचा मुक्काम अगदी २१ दिवसांपर्यंतही लांबतो. पण अनंताचा दिवस म्हणजे त्यालाही आता आपल्या आईची आठवण येऊ लागलेली असते. मन हिमवानाकडे ओढ घेत असते. थोडासा वास्तववादी दृष्टिकोन बाजूला ठेवला, तर समुद्र आणि हिमालय या दोघांची एक सुंदर आणि अद्भुत सांगड येथे घातलेली दिसते. दोघेही भव्यतेची दोन टोके. सागराच्या लाटांवर आरूढ होऊन गणेश हिमालयाकडे स्वगृही परत जाण्यास निघतो. ही कल्पनाच मला मोठी मनोरम वाटते.
येथे मला पुन्हा वास्तवावर यावेच लागते. कारण गणेशाचे आणि त्याच्या आईचेही निसर्ग तत्त्वावर निरतिशय प्रेम आहे. पर्यावरणाला हानिकारक काहीही घडलेले दोघाही मायलेकांना अजिबात चालत नाही. पण बाप्पाचे अतिउत्साही भक्त मात्र अवाढव्य मूर्ती समुद्रात विसर्जित करतात. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या त्या मूर्ती पाण्यात विरघळायला तब्बल ६ महिने लागतात. ब्रम्हांडाच्या नियमानुसार समुद्र त्याच्याकडे काहीच ठेवत नाही. तुम्ही जे त्याला देता ते तो परत आणून किनाऱ्यावर ठेवतो. या भल्या मोठ्या मूर्तींचे काय होते हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही.
तसेच अजून एक मनास खटकणारी गोष्ट म्हणजे बाप्पाच्या मिरवणुकीत भक्तगणांचा विशेषत: स्त्रीवर्गाचा तुफान वेडावाकडा नाच. यामागचे कारण आणि तत्त्व मला अजूनही कळलेले नाही. लोकप्रिय मराठी मालिकाही या गोष्टीला प्रोत्साहनच देतात. मुळात हा क्षण इतका नाजूक आणि भावपूर्ण असतो की त्याचे जाणेच सहन होत नसते. डोळ्यांतील पाणी थांबत नसते. या साऱ्यात विविध अंगविक्षेपासहित नाच कुठे बसतो हेच मला समजतो. बाप्पाच्या मिरवणुकीसाठी ढोलताशे पथक ही मला एक शिस्तबद्ध आणि तालासुरातील कल्पना वाटते आणि पटतेही. त्या वादनातील लयबद्धता, लेझीमची शिस्त सारेच मनास भिडणारे असते. या ढोलताशांच्या गजरात भक्तगणांचे आवाहन त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असेल.
याखेरीज अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या येथे मांडाव्याशा वाटतात. रस्त्यावर जागोजागी उभारले जाणारे सभामंडप, एकाच रस्त्यावर दहा ते बारा सार्वजनिक गणपती बसविलेले असतात, आभाळाला भिडणाऱ्या उंचीची अहमहिका, देखाव्यांचा प्रचंड पसारा यात मला असे वाटते की बाप्पाचा निरागसपणा, साधेपणा त्याच्यातील बाल्य कुठेतरी हरवून जाते आणि उरतो तो फक्त देखावा.
मोठ्या हौसेने बाप्पा आपल्याकडे येतो. मग त्याची निसर्गाशी असलेली बांधिलकी जपण्याची जबाबदारी आपलीच नाही का? शहरातील एक ठिकाण एक गणपती, मर्यादित उंची, मूर्तीसाठी शाडू मातीचाच वापर ही काही पथ्ये जर आपण पाळली तर हे दोघेही मायलेक किती खूश होतील पाहा. प्रत्येकानेच विचार करूया. मूर्तीची उंची आभाळभर न करता भक्ती आभाळाएवढी करूया आणि पुढच्या वर्षीचे वचन घेऊनच त्याला साश्रुपूर्ण निरोप देऊया.