Saturday, September 6, 2025

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. नोबेल ऑटो पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे पंप व्यवस्थापनाने सुरक्षेच्या कारणास्तव सीएनजीचा पुरवठा किमान १० ते १२ दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवणी फाटा येथील या पंपाची संरक्षण भिंत चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कोसळली. ही भिंत पंपावरील मोठा विद्युत जनरेटर आणि सीएनजी गॅसच्या टाक्यांच्या अगदी जवळ असल्याने, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने नवीन भिंत बांधणे आवश्यक आहे. पंप व्यवस्थापक दानिश डीमटीमकर यांनी ही माहिती दिली.

मंडणगड तालुक्यात हा एकमेव सीएनजी पंप असल्याने, वाहनचालकांना आता ४० किलोमीटर दूर असलेल्या खेड, दापोली किंवा महाड येथील पंपांवर जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. स्थानिक नागरिकांनी एचपीसीएल कंपनीकडे लवकरात लवकर सीएनजी पुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment