रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा बाप दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या 'सायली बार'मध्ये दोन खून झाले, त्याच बारमधून मृत भक्ती मयेकर हिचा मोबाईल पोलिसांना सापडला आहे.
दुर्वास पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात आता त्याचा बाप दर्शन पाटील याचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. दर्शन पाटील हा त्या सायली बारचा चालक आहे, जिथे भक्ती आणि अन्य एका व्यक्तीचा खून झाला. आता पोलिसांना मिळालेला भक्तीचा मोबाईल हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या मोबाईलचा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासला जात असून, त्यातून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
तीन खुनांचे उलगडले रहस्य
भक्ती मयेकर (वय २६) हिने लग्नासाठी तगादा लावल्याने दुर्वास पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांनी १६ ऑगस्ट रोजी तिचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह संगमेश्वरमधील आंबा घाटात फेकून दिला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, दुर्वासने आणखी दोन खून केल्याचे उघड झाले.
- पहिला खून (सिताराम किर): भक्तीशी बोलण्याच्या रागातून दुर्वासने बारमध्ये काम करणाऱ्या सिताराम किर याला मारहाण केली होती. मारहाणीनंतर सितारामचा मृत्यू झाला.
- दुसरा खून (राकेश जंगम): वर्षभरापूर्वी सितारामच्या मृत्यूची माहिती राकेश जंगम याला असल्याने दुर्वासने त्याचाही खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता. राकेश गेल्या वर्षी जूनपासून बेपत्ता होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत, तपासणीचे कौतुक केले आहे.