Saturday, September 6, 2025

Pune Kasba Ganpati Visarjan: कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या...

Pune Kasba Ganpati Visarjan: कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या...
पुणे: आज अनंत चतुर्दशी, दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील गणेश मूर्त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यातही मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला जोरदार सुरुवात झाली आहे. पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती हा लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, ढोल ताशाचा गजर आणि गुलालाच्या रंगात पुण्याचे रस्ते रंगले आहेत. दरम्यान कसबा गणपतीच्या भव्य मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे, कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पुण्याच्या रस्त्यावर रंगीत रांगोळ्याच्या पायघड्या दिसून आल्या, ज्यामुळे गणेशोत्सवाची रंगत आणखीनच वाढली.

कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या

पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्यांमध्ये फुलांच्या रांगोळ्या, पारंपरिक डिझाइन्स, सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले. या रांगोळीने मिरवणुकीला खास रंगत आणली. कसबा गणपतीच्या मिरावणुकीच्या ठिकाणपासून अलका चौका पर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या गेल्या. यासाठी एक हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने मागच्या २८ वर्षांपासून कसबा गणपतीच्या मिरवणुकीत रांगोळी काढली जाते. वेगवेगळे सामाजिक संदेश या माध्यमातून दिले जातात. यावर्षी प्लास्टिक, आणि कचरा या विषयावर सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
Comments
Add Comment