कोल्हापूर: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना जड अंतःकरणाने निरोप दिला जात आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी ढोल ताशाचा आवाज, फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि फुलांच्या रंगीत रांगोळीच्या पायघड्या विविध गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाच्या मिरावणुकीची रंगत वाढवत आहेत. मुंबई, पुणे येथील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणरायांच्या मिरवणुकीवर सर्वांच्या नजरा रोखल्या असताना, कोल्हापुर येथील मंगळवार पेठेतील एका मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीतील चित्ररथ चर्चेचा विषय ठरत आहे.
आज सर्वत्र दहा दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाची जल्लोषात मिरवणूक काढली जात आहे. सोसायटी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतीना आज निरोप दिला जात आहे. यादरम्यान कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी उभारलेला देखावा पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत या मंडळाने आकर्षक आणि विचारप्रवर्तक चित्ररथ सादर केला आहे. यावर्षी या मंडळाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर करत आपले नावीन्य कायम ठेवले आहे. गेल्यावर्षी या मंडळांने साईंची लीला श्रद्धा आणि सबुरी असा सजीव देखावा सादर केला होता. या साईंच्या विचारानेच प्रेरित होऊन मंडळांने साईबाबांचे मंदिरही ३३ वर्षांपूर्वी बांधले होते. समाज प्रबोधनपर चित्ररथासह गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे मंडळ अशी या मंडळाची विशेष ओळख आहे.
कोल्हापूरमध्ये अनोखी विसर्जन मिरवणूक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त सजवलेला भव्य रथ आणि ३५० कार्यकर्त्यांचा वारकरी वेशातील सहभाग प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनाला भावला. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे सजीव चित्रण, पारंपरिक धनगर ढोल पथक, पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील झांजपथक तसेच ७० महिलांचे पारंपारिक वेशभूषेतील टाळ-मृदंगासह असणारे पथक, या पथकात विठ्ठलाने रुक्माई च्या रूपात सहभागी झालेले बालचमू या सगळ्यांमुळे संपूर्ण मिरवणूक मंगलमय झाली. पर्यावरणपूरक सण, सामाजिक संदेश आणि धार्मिक परंपरा यांचा संगम घडवणाऱ्या लेटेस्ट तरुण मंडळाच्या या अनोख्या सादरीकरणाने कोल्हापूरकरांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळी आणि विधायक गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला मिळाली.