Thursday, September 4, 2025

वरुणराजाचे तांडव

वरुणराजाचे तांडव
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचे तांडव सुरू असून अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाल्यास मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उरण, वसई-विरार आदी भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरवर्षी होणाऱ्या पावसाचा कोकण भागातील धुमाकूळ ही नित्याचीच बाब झाली आहे. दरवर्षीच्या पावसाळा कालावधीतील अतिवृष्टी एव्हाना कोकणी माणसाच्याही अंगवळणी पडलेली आहे. गणेशोत्सवामध्ये दरवर्षी हमखास पाऊस असतोच. यंदाही पावसाने आपल्या उपस्थितीचे अस्तित्व दाखवून दिले आहे. जून ते सप्टेंबर असा पावसाचा हंगाम असला तरी यंदा पावसाने मे महिन्यापासूनच सुरुवात केलेली आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जून-जुलै महिन्यांत दडी मारली होती. अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांनाही ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात संजीवनी प्राप्त झाली होती; परंतु ऑगस्ट महिन्यात ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीने जून-जुलै महिन्यांचा बॅकलॉग भरून काढला होता. पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पाऊस थैमान घालत आहे. या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. पंजाबमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर १०१८ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि पावसामुळे राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत. प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत ११ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. रावी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने गुरुदासपूर जिल्ह्यातील घोणेवाले येथील धुस्सी बंधारा फुटला. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागाबरोबरच मध्य भागातही बुधवारी मुसळधार पाऊस झाला. पूरग्रस्त पंजाब आणि हरियाणामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा भूभाग पाण्याखाली गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, गुरसादपूर आणि मोहाली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर हरियाणाच्या अंबालामध्ये या कालावधीत १०५.६ मिमी इतका पाऊस झाला. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंडिगडमध्ये ६३.६ मिमी पाऊस झाला. हरियाणातील घग्गर, मार्कंडा आणि टांगरी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पंजाबच्या सतलज, बियास आणि रावी या नद्यांसह हंगामी उपनद्यांची पातळी वाढल्यामुळे त्या राज्यात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पंजाबमध्ये एनडीआरएफ, लष्कर, बीएसएफ, पोलीस आणि जिल्हानिहाय प्रशासन यांच्यामार्फत पूरग्रस्त भागांमध्ये मदत व बचावकार्य सुरू आहे. छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि अन्य तिघे जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पूरग्रस्त प्रदेशांसाठी तातडीने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी विनंती विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. लहरी हवामानामुळे उन्हाळ्यात पाऊस असतो, तर पावसाळ्यात उकाडा जाणवतो आणि थंडीच्या काळात पाऊस, कडाक्याचे ऊन या दोन्हींचा मिलाफ पाहावयास मिळतो. हवामानातील बदल जरी विनाशास हातभार लावत असला तरी प्रशासनाला या घडामोडीतील हानी रोखण्यासाठी आलेल्या अपयशाचे खापर हे निश्चितच प्रशासनावर फोडले पाहिजे. भूतलावरील वृक्षसंपदेचे घटते प्रमाण ही प्रामुख्याने मुख्य बाब मानली जात आहे. वृक्षसंपदा कमी झाल्याने भूसंखलनाचे प्रमाण वाढले आहे. वृक्षांची जमिनीमध्ये खोलवर गेलेली मुळे ही जमीन पकडून ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असते. तसेच थोडा जरी पाऊस पडला तरी आपणाकडे नदी-नाले तुडुंब भरले. धरणे-तलाव ओव्हर फ्लो झाले, असे वाचावयास मिळते; परंतु वास्तविकता काही वेगळीच असते. नदी, नाल्यामध्ये सभोवतालची माती-गाळ वाहत येत असतो. अनेक वर्षे आपल्या नद्या, तलाव, धरणातील गाळ काढण्यात न आल्याने तलाव व समुद्राची खोली कमी होत चालली असून याचा साठा क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम झालेला आहे. याचे उत्तम उदाहरण आपणास हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी खाडीपुलावर दिसून येते. १९९०च्या सुमारास वाशी खाडीपुलावरून मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान रेल्वे सुविधा उपलब्ध झाली. आज जवळपास ३५ वर्षे या घटनेला लोटली आहेत. या साडेतीन दशकांमध्ये वाशी खाडीमध्ये सभोवतालच्या भागातील कचरा, माती नाल्यांच्या माध्यमातून विसावला आहे. या खाडीतील गाळ, माती प्रशासनाकडून आजतागायत काढण्यात आलेली नाही. त्यामुळे वाशी खाडीपुलावरील रेल्वे आणि खाडीतील पाणी यामध्ये एकेकाळी खूप अंतर होते, पण आता ते अंतर मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि खाडीच्या लाटा व त्यातून धावणारी रेल्वे पाहिल्यावर खाडीतील पाणी काही अंतरावर येऊन ठेपल्याचे स्पष्टपणे दिसून येते. बद्रीनाथ, केदारनाथ यांसह अन्य धार्मिक स्थळांवर पावसाळ्यात अडथळे येत असल्याने या यात्रा दरवर्षीच स्थगित कराव्या लागतात. पाऊस तर दरवर्षी पडत असतोच, तो हानी करणार याचीही आपणास माहिती असते. मग आपण उपाययोजना का करत नाही? हानी टाळण्यासाठी उरलेल्या आठ महिन्यांत उपाययोजना का करत नाही? उत्तरे आपणास शोधावीच लागतील, अन्यथा हा निसर्गाचा प्रकोप, वरुण राजाचे तांडव यामुळे वसुंधरेवरील जीविताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
Comments
Add Comment