
रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी पंपांवर मोठी गर्दी झाली. रात्री १२ वाजता सीएनजीचे दर ५० पैशांनी वाढले. दर बदलाची प्रक्रिया सुरू असताना जवळपास अर्धा तास पंप बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांच्या रांगा प्रचंड वाढल्या होत्या. सीएनजीपंपाबाहेर रात्रीच्या वेळीच शेकडो वाहने थांबल्याने मोठा खोळंबा झाला.
कोकणात गेलेले हजारो गणेशभक्त परतीच्या मार्गावर
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले हजारो गणेशभक्त आपल्या गावी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अशातच दरवाढ झाल्यानं पंप बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाड्यांमध्ये कुटुंबासह लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असल्यानं नागरिकांचा संताप आणखी वाढला. अनेक ठिकाणी वाहनचालक आणि सीएनजी पंप कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीचा पंप बंद करणे आणि दर बदलाच्या प्रक्रियेत अर्धा तास वाया घालवणे, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. वाढलेले दर एकीकडं आणि झालेला खोळंबा दुसरीकडे यामुळे दुहेरी त्रास सहन करावा लागतो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले.
सीएनजी दरवाढीमुळे आर्थिक फटका
CNG दरवाढ आणि खोळंब्यामुळे रात्री उशिरा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. गॅससाठी ताटकळणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे अन्य वाहनांनाही पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. काही वाहनचालकांनी पंपावरच निदर्शने करण्याचा इशारा दिला. अनेक गणेशभक्त आणि वाहनचालक रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशावेळी पंप सुरू ठेवून योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. सीएनजी दरवाढीमुळे आधीच आर्थिक भार वाढला आहे. त्यात अशा अचानक खोळंब्यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.
कोकणवासीयांच्या त्रासात भर
कोकणात बहुतांश गणेश मूर्तीची स्थापना दीड दिवस, पाच दिवस असल्याने अनेक गणेशभक्त मुंबईला परतत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची खराब स्थिती असल्यानं कोकणवासीयांना मुंबईला परत येतांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यात सीएनजी पंपावरील गर्दी आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.