ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी येथील डोहळे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गनजीक असलेलल्या साईधाम लॉजिस्टिकसमोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश अधिकारी (वय ३९) व त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय ११) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही भिवंडी तालुक्यातील सापे गावातील नातेवाईकांकडे देवदर्शनासाठी आले होते व घरी परतत असताना हा अपघात घडला.
या अपघातामुळे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात गणेशोत्सवाच्या काळात शोककळा पसरली आहे. मृतदेह पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले असून, या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत.