
जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनात ट्विस्ट
मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha-OBC Reservation) देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ५ दिवस आमरण उपोषण केले. ज्यात त्यांना यश आले, सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य करत शासन निर्णय देखील जाहीर केला. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले (Mudhojiraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात, नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर केलेल्या उपोषणात, मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याची प्रमुख मागणीसह हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा देखील समावेश आहे. यादरम्यान शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे. तसेच इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. मात्र या दरम्यान मुधोजी राजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, जरांगे यांच्या मराठा आंदोलनावर प्रश्न उपस्थित करणारे ठरणार आहे.
ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं?
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं, यामध्ये मराठ्यांना काय मिळालं? असा सवाल राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, पण त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? असा सवाल राजे मुधोजी भोसले यांनी केला आहे.
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात अर्थाच काही त्रुटी आहेत. परंतू ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांन नक्कीच लाभ मिळावा. कागदपत्रांची पूर्रता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे यात शंका नाही. अशात उर्वरीत अंदाजे २.५० कोटी मराठ्याचं काय आहे? असा सवाल देखील राजे मुधोजी भोसले यांनी या पत्राद्वारे केला आहे.
मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल
या पत्रात त्यांनी पुढे लिहिले आहे की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझं व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे, जेणेकरुन हा पेच निर्माण होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे राजे मुधोजी भोसले यांनी पत्रात म्हटलं आहे. मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावे, जेणेकरुन ५८ लाख कुणबी नोंदीवाले मराठे +उर्वरीत २.५० कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे भोसले म्हणाले.