
मराठवाड्यातील नांदेड ,लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील १३० मंडळात येणाऱ्या जवळपास २ हजार५५० गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे पिकांची तर नासाडी झालीच आहे पण शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या अतिवृष्टीची सरकार दरबारी नोंद आहे. पालकमंत्र्याकडून त्याची पाहणीही झाली आहे. परंतु अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीसाठी अजून वाट पहावी लागत आहे.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील १३० मंडळांत येणाऱ्या जवळपास २५५० गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. वार्षिक सरासरी ६७९ मि.मी.च्या तुलनेत विभागात ५७३ मि. मी. म्हणजेच ८४% पाऊस झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांची पूर्ण नासाडी झाली. एवढेच नव्हे तर शहरी भागात असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त नागरिक, शेतकरी व व्यापारी राज्य शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांकडूनही पूरग्रस्त भागाची पाहणी झालेली आहे. शासनाने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर कायम असून नांदेड जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १३२.७ मिलिमीटर पाऊस झाला. याच जिल्ह्यातील ७३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. मागील आठवड्यात चार दिवस मराठवाड्याला पावसाने झोडपले. विभागात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ६० मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक होती. नांदेड जिल्ह्यात एका दिवसात १३२.७ मिमी पाऊस झाला तर लातूरला ९१.८, छत्रपती संभाजीनगर २९.९, जालना १३.१, बीड ४८.४, धाराशिव १६.१, परभणी ३८.४ आणि नांदेड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १३२.७ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोलीत १९.९ असा जिल्हानिहाय पाऊस झाला. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात अनेक पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आजही बंधारे, तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहत आहेत. या दोन जिल्ह्यांत पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विभागात १३० महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ७३ मंडळांचा समावेश आहे. कंधार आणि माळाकोळी महसूल मंडळात २८४ मिमी पाऊस झाला. विष्णुपुरी (२६७), कुरुळा (२२९), बारूळ, जायकवाडी धरणे भरली. जोरदार पावसामुळे मोठ्या धरणात पाण्याची आवक वाढली. जायकवाडी, सिद्धेश्वर, मानार आणि सिना कोळेगाव ही धरणे पूर्ण भरली आहेत. निम्न दुधना ७५, येलदरी ९६.३१, माजलगाव ८२.७९, मांजरा ९९.२०, पैनगंगा ९६.१५, निम्न तेरणा ९६.९२, विष्णुपुरी ५८.५५ असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या ११ धरणात ९३.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. पेठवडज (२७५), डिग्रस (२२९) आणि कापसी (२६७) या मंडळात विक्रमी पाऊस झाला. मागील आठवड्यात संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन ठप्प झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मंडळे, बीड जिल्ह्यातील १६ आणि लातूर जिल्ह्यातील ३६ मंडळांत अतिवृष्टी झाली. लाखो हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडणार नाही, हे सिद्ध झाले आहे.
मराठवाड्यात पुन्हा ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने लष्कराच्या तुकडीला मदतीला बोलवावे लागले. पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. हा पाऊस ढगफुटीलाही लाजवेल एवढा मोठा होता. या पावसाबरोबरच नांदेड व लातूर जिल्ह्यात तेलंगणा, कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांना बॅकवॉटरचा फटका बसला. एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले. अनेकांच्या घरात, दुकानात, शेतात, कारखान्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या पाण्याचा अंदाज लावणे देखील कठीण होऊन बसले आहे. सलग साडेतीन ते चार तास ढगफुटीसदृश पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस व चमकणाऱ्या विजा मनात धडकी भरवणाऱ्या होत्या. या पावसामुळे अपरिमीत हानी झाली. लातूर व नांदेडमधील हजारो नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले होते.
या पाण्याला बाहेर काढण्यासाठी अनेकांना दुपारपर्यंत झटावे लागले. मराठवाड्यात यंदाच्या अतिवृष्टीत नुकसानीचा अंदाज लावणे देखील कठीण होऊन बसले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नरसी, नायगाव, मुखेड, कंधार, देगलूर, उमरी, मुदखेड, धर्माबाद, माहूर, किनवट, भोकर, अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. बिलोली तालुक्यात बॅकवॉटरचा मोठा फटका बसला. आकाशातून बरसणाऱ्या धारा व बॅकवॉटरच्या पाण्यामुळे महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांचा संपर्क तुटला होता. या दोन राज्यांना जोडणाऱ्या सालूरा-बिलोली मार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तेथील पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. दक्षिणेकडील निजामाबाद, हैदराबाद, बोधन, कामारेड्डी या भागात मुसळधार पाऊस झाला. तेलंगणा, कर्नाटक या राज्यात दोन दिवस मोठा पाऊस झाला. हा पावसाचा जोर या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या लातूर व नांदेड जिल्ह्यातही वाढला. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. गावातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे तेथील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले. नांदेड, हिंगोली व परभणीतही मोठा पाऊस झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हैदराबाद विभागातील भिकनूर-तळमडला सेक्शन, अक्कमपेठ-मेदक सेक्शन या मार्गांवर मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने सर्वच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत काही रेल्वे पटरीवरून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीस रेल्वे विभागाने मनाई दर्शवली. त्याबरोबरच धर्माबाद-निझामाबाद-कामारेड्डी या रेल्वे स्थानकाच्या पटरीखालून गिट्टी वाहून गेल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक रेल्वेंचे मार्ग वळविण्यात आले. मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस निजामाबादपासून वळविण्यात आली होती. तेलंगणात जाणाऱ्या काही गाड्या अंशिक रद्द करण्यात आल्या होत्या.
मागच्या आठवड्यात मराठवाड्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील ६ लाख ६२ हजार हेक्टवरील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे शिल्लक असतानाच मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा आभाळ फाटले. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे या पूर्वीच सर्वाधिक नुकसान झाले. जवळपास ३ लाख हेक्टवरील पिके बाधीत झाल्याची शासन दफ्तरी नोंद आहे. मराठवाडा विभागात यंदा पावसाळ्यात आतापर्यंत ४१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामधील सर्वाधिक १५ जणांचा समावेश नांदेडचाच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात ११ जणांचा मृत्यू झाला. मराठवाडा विभागात आतापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात ९२७ जनावरे दगावली असल्याची नोंद आहे.
मराठवाड्यात या पावसाळ्यात १ हजार ८८७ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अद्याप शेतकऱ्यांना संपूर्ण मदत पोहोचलेली नसतानाच निसर्गाने रौद्ररूप धारण करून मराठवाड्यात पुन्हा जलसंकट निर्माण केले. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव व वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. कयाधू नदीच्या पुरात एक अठरा वर्षीय तरुण वाहून गेल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. शेख अरबाज शेख फिरोज असे त्या तरुणाचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुका संपूर्ण जलमय झाला होता. येलदरी व निम्न दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला. परभणी जिल्ह्यात नदीनाल्यांना पूर आल्यानंतर संपूर्ण शेत शिवार पाण्याखाली गेले होते. बीड जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडाला. त्या ठिकाणी १४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे, तर दीड लाख हेक्टर खरीप पिके पाण्याखाली गेल्याची शासन दरबारी नोंद आहे.
- डॉ. अभयकुमार दांडगे