
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाचा क्यूआर कोड अनेक वेबसाईटवर उपलब्ध आहे. याचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट रेल्वे प्रवास करतात आणि तपासनीस दिसताच एखाद्या वेबसाईटवरील क्यूआर कोड स्कॅन करुन आयत्यावेळी तिकीट खरेदी करतात. अनेक प्रवाशांनी क्यूआर कोड सेवेचा गैरफायदा घेतला आहे. हा प्रकार लक्षात येताच मध्य रेल्वे प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत क्यूआर कोड द्वारे होणारी तिकीट विक्री स्थगित केली आहे. आता प्रवाशांना रांगेत उभे राहून अथवा मोबाईलवर डाऊनलोड केलेल्या यूटीएस अॅपच्या मदतीने तिकीट खरेदी करावे लागेल. मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्याही स्थानकासाठी क्यूआर कोड द्वारे तिकिटाची खरेदी करता येणार नाही. पश्चिम रेल्वे थोडा प्रवास आणि पुढे मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन अथवा उरण - बेलापूर लाईनवर अथवा उलट पद्धतीने प्रवास करत असलेल्यांनाही क्यूआर कोड द्वारे तिकिटाची खरेदी करता येणार नाही. रेल्वे स्थानकात असताना तिकीट खरेदीसाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम, जेटीबीएस असे पर्याय उपलब्ध आहेत.
यूटीएस अॅप क्यूआर कोडद्वारे डाऊनलोड करुन अॅपद्वारे तिकिटाची खरेदी करता येईल. पण आयत्यावेळी स्थानकाचा क्यूआर कोड स्कॅन करुन तिकिटाची खरेदी करता येणार नाही. अॅपद्वारे तिकीट खरेदी करण्यासाठी आधी अॅपमध्ये स्वतःची नोंदणी करावी लागले. लॉग इन करुन नंतर तिकिटाची खरेदी करता येते. यामुळे अॅपच्या क्यूआर कोड संदर्भात कोणताही नवा निर्णय घेतलेला नाही.
लवकरच मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाचा डायनॅमिक क्यूआर कोड विकसित केला जाणार आहे. डायनॅमिक क्यूआर कोड हा प्रत्येकवेळी विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे सर्व्हरशी जोडलेला असतो आणि ठराविक सेकंदांच्या अंतराने बदलत राहतो. यामुळे डायनॅमिक क्यूआर कोड इमेज अर्थात फोटो स्वरुपात कोणत्याही वेबसाईटवर कायमस्वरुपी ठेवणे शक्य नाही. सर्व स्थानकांवर डायनॅमिक क्यूआर कोडची व्यवस्था केल्यानंतर मध्य रेल्वे पुन्हा एकदा क्यूआर कोडद्वारे तिकिटांची विक्री सुरू करणार आहे.