
जाहिरातीतून उत्पादनांची योग्य माहिती मिळून ग्राहकांना आवश्यक उत्पादनाची निवड करणे सुलभ व्हावे या उद्देशाने विविध माध्यमातून जाहिराती प्रसरित केल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. पण तसे न होता आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी जाहिराती नानाविध पद्धतीने अतिरंजित करून प्रसारित केल्या जातात. जाहिरातीतील फसव्या दाव्यांना भुलून खरेदी करण्याच्या ग्राहकांच्या मानसिकतेमुळे उत्पादकांचे फावते. अशा भुरळ घालणाऱ्या जाहिराती पाहताना ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे.
व्यवसायवृद्धी झाली तर उत्पादक कंपनीची आर्थिक स्थिरता वाढते. यासाठी कंपनीचे नाणे खणखणीत असले पाहिजे. त्याऐवजी फसव्या जाहिरातींद्वारे ती मागणी वाढवली जाऊन व्यवसायवृद्धी केली जाते तेव्हा ग्राहकांनी सजग होणे महत्त्वाचे ठरते. प्रथितयश व्यक्तींचा वापर करून, रचनात्मक, कलात्मक चित्रीकरण करून प्रसारित केलेल्या जाहिरातीमुळे उत्पादन वा सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकाला कित्येकदा आपली विचारसरणी बदलायला प्रवृत्त केले जाते आणि ग्राहकांच्या सवयी बदलण्याची किमया केली जाते. त्यामुळे केवळ जाहिरातीतील दाव्यावर अंध विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीने त्याची सत्यासत्यता पडताळून आपल्या गरजेनुसार वस्तू किंवा सेवा घेण्याचा निर्णय घेतला, तर ग्राहकांवर पश्चात्तापाची वेळ खचितच येणार नाही. विशिष्ट शब्द, आकर्षक पंचलाईन, आवडता क्रिकेटपटू किंवा अभिनेता यांचा वापर करून प्रसारित केलेल्या खाद्यपदार्थ, निरनिराळी पेये यांच्या रंगीबेरंगी जाहिरातींचा भुलभूलैया लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना असे पदार्थ सेवन करण्यास उद्युक्त करतो. शिवाय मोबाइलची बटणं दाबली की काही मिनिटांत सगळं काही घरपोच मिळतं. या पदार्थांच्या सेवनाने आपल्या तब्येतीत किंवा सौंदर्यात फरक पडू नये म्हणून मग योगसाधना करणे, मॅरेथॉन धावणे, जिममध्ये जाणे अशा विविध मार्गांचा पर्याय निवडला जातो. लिपोलेसर, कूलस्कल्प्टिंग तंत्रज्ञानाचा पर्यायही लठ्ठपणा कमी करण्यासाठी निवडला जातो. असे पर्याय बरेचदा जाहिराती बघूनच निवडले जातात.
कूलस्कल्प्टिंग तंत्रज्ञानात शरीरात जेथे मेद असतो त्या भागावर मशीन लावली जाते. ही मशीन तेथील मेद थंड करून त्यावर नियंत्रण ठेवते. यामुळेच कूलस्कल्प्टिंग मशीन केवळ त्वचाविकार आणि प्लास्टिक सर्जरीमध्येच नव्हे तर वैद्यकीय स्पा सेंटरमध्येही ठेवल्या जाऊ लागल्या आहेत. शस्त्रक्रियेविना वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणून गेल्या दशकापासून हे अधिक लोकप्रिय झाले असावे.
असाच एक पर्याय व्हीएलसीसीने आपल्या ग्राहकांसाठी दिला. लिपोलेसर, कूलस्कल्प्टिंगच्या एका सत्रात ग्राहकाची ६ सेंमी आणि ४०० ग्रॅम चरबी घटू शकेल असा दावा व्हीएलसीसीने जाहिरातीतून केला होता. पण यात तथ्य नसल्याचे लक्षात येताच हैदराबाद येथील अजय गुप्ता यांनी व्हीएलसीसीच्या जाहिरातीला आव्हान दिले. त्यांनी व्हीएलसीसी विरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोगाकडे (सीसीपीए)कडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
आयोगाने तक्रारीत तथ्य असल्याचे जाणून सप्टेंबर २०२३ मध्ये एक कारणे दाखवा नोटीस पाठवली. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी असल्याने व्हीएलसीसीने कायद्याचे उल्लंघन केले आहे असा निष्कर्ष, महासंचालकांच्या चौकशीअंती काढण्यात आला. यावर व्हीएलसीसीने कूलस्कल्प्टिंगची वादग्रस्त जाहिरात बंद करण्यास सहमती दर्शवली; परंतु त्यातून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे अमान्य केले.
व्हीएलसीसी वापरत असलेल्या लिपोलेसर मशीनसाठी नियामक मंजुरी नसल्याने सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यात व्हीएलसीसी अपयशी ठरले, जे ग्राहकांसाठी धोकादायक आहे, असे नियामक प्राधिकरणाने नमूद केले. तसेच व्हीएलसीसीने आपला दावा सिद्ध करण्यासाठी केलेल्या शास्त्रीय कसोटीसाठी भारतीय वा आशियाई लोकांचा समावेश न करता त्यासाठी ५७ परदेशी लोकांची निवड केली होती. याचा उल्लेख जाहिरातीत नव्हता. शिवाय व्हीएलसीसी कूलस्कल्प्टिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून, जाहिरातीतील कलमांचा उल्लेख असलेल्या नोंदणी अर्जावर सहमतीपर स्वाक्षरी घेत असल्याने हे दावे निराधार आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे व्हीएलसीसी जाहिरातीतील दाव्यांची जबाबदारी झटकू शकत नाही. यामुळे ग्राहकाला सेवेची योग्य माहिती मिळण्याचा ग्राहकाचा अधिकार डावलला गेला असल्याचा आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए)चे मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी दिला. व्हीएलसीसीची बाजारपेठेतील पत आणि मागील दोन वर्षांची आर्थिक उलाढाल विचारात घेऊन अशी जाहिरात प्रकाशित केल्याबद्दल व्हीएलसीसी लिमिटेडवर ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, अनुचित व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवून ग्राहकांच्या हिताचे नियमन करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण(सीसीपीए), हे ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत स्थापन केलेले एक नियामक प्राधिकरण आहे. ग्राहक एक वर्ग म्हणून विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करू शकतो. तसेच राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या टोल फ्री क्रमांक १८००-११-४००० किंवा १९१५ किंवा ८८०००१९१५ या एसएमएस क्रमांकावर ग्राहक यासंदर्भात वैयक्तिक तक्रार करू शकतो.
- स्नेहल नाडकर्णी