
मुंबई : बेस्ट उपक्रमाने ए ८४ या मार्गावर नवी एसी बस सेवा सुरू केली आहे. ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) ते ओशिवरा डेपो अशी असेल. ही बस कोस्टल रोड मार्गे अर्थात धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरुन धावणार आहे. नवी बससेवा रविवार ७ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
ए ८४ या मार्गावरील बेस्टची बस दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील प्रमुख ठिकाणांना जोडणारा आरामदायी प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) येथून निघाल्यानंतर चर्चगेट स्टेशन (अहिल्याबाई होळकर चौक), वरळी सी फेस, वरळी डेपो, माहीम, खार स्टेशन रोड (पश्चिम), सांताक्रुझ डेपो, विलेपार्ले, अंधेरी स्टेशन (पश्चिम), शिवाजी पार्क, ओशिवरा ब्रिज आणि ओशिवरा डेपो असा प्रवास करणार आहे. दर ४५ मिनिटांनी ए ८४ या मार्गावर एक बस सुटेल. आठवड्याचे सातही दिवस ही बससेवा सुरू राहणार आहे.
ओशिवरा डेपो येथून पहिली बस सकाळी ७.१५ वाजता सुटेल आणि शेवटची बस संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) येथून सकाळी ८.५० वाजता पहिली बस सुटेल आणि संध्याकाळी ७.१५ पर्यंत वाजता शेवटची बस सुटणार आहे. या बससाठी किमान भाडे १२ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये असेल.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज रस्ता, जो मुंबई कोस्टल रोड म्हणून प्रसिद्ध आहे , तो सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी आणि बसेससाठी २४/७ खुला करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने ए ८४ मार्गाची बस कोस्टल रोड मार्गे अर्थात धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरुन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोड याच वर्षी १६ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या रस्त्यावरुन बेस्टची बस धावणार आहे.