Friday, September 5, 2025

Baaghi 4 Review : सोशल मीडियावर ‘बागी ४’ची धूम! टायगरचा तगडा कमबॅक तर संजय दत्तची खलनायकी एन्ट्री; प्रेक्षक काय म्हणाले?

Baaghi 4 Review : सोशल मीडियावर ‘बागी ४’ची धूम! टायगरचा तगडा कमबॅक तर संजय दत्तची खलनायकी एन्ट्री; प्रेक्षक काय म्हणाले?

टायगर श्रॉफचा बहुचर्चित ‘बागी ४’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल मोठी चर्चा रंगली होती. चित्रपटगृहात रिलीज होताच प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी टायगर श्रॉफच्या दमदार परतीचं स्वागत करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तसेच संपूर्ण स्टारकास्ट आणि कथानकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टायगर श्रॉफचा जबरदस्त कमबॅक

‘बागी ४’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. अनेकांनी टायगर श्रॉफचा हा दमदार कमबॅक असल्याचे म्हटले आहे. एका वापरकर्त्याने आपल्या X (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले की, “या चित्रपटाची कथा ‘बागी’ मालिकेतील इतर चित्रपटांपेक्षा खूपच प्रभावी आहे. पहिल्या ३० मिनिटांतले सीन तर अप्रतिम आहेत.” दुसऱ्या प्रेक्षकाने कमेंटमध्ये नमूद केले की, “गाणी, अ‍ॅक्शन आणि थरार – सर्व गोष्टींनी मिळून हा एक परिपूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज ठरतो.” तसेच आणखी एका वापरकर्त्याने टायगरच्या अभिनयाचं कौतुक करत लिहिलं की, “रॉनीच्या भूमिकेतला टायगर श्रॉफचा अभिनय प्रेक्षकांना थक्क करतो. कथा इतकी रोमहर्षक आहे की तुम्हाला स्क्रीनवरून डोळे हटवता येणार नाहीत. त्यातच संजय दत्तचे पात्र चित्रपटाच्या थराराला अधिक उंचीवर नेते.”

संजय दत्तचा खतरनाक अंदाज चर्चेत

‘बागी ४’ मध्ये टायगर श्रॉफ प्रेमाच्या आहारी जाताना दिसतो, तर दुसरीकडे संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत संपूर्ण चित्रपटावर छाप पाडतो. त्याचा लूक आणि अभिनय या दोन्ही गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या पात्राची प्रशंसा केली आहे. एका एक्स (ट्विटर) वापरकर्त्याने लिहिले, “संजय दत्त फक्त खलनायकाची भूमिका करत नाही, तर तो प्रेक्षकांना त्याच्या रागाची तीव्रता आणि मनातील वेदना अनुभवायला लावतो. त्याचा अभिनय जादुई आहे.” याशिवाय काहींनी असेही नमूद केले की, “‘बागी ४’ मध्ये संजय दत्तच्या अभिनयात ‘वास्तव’ चित्रपटातील क्रूरता आणि भावनिकतेची झलक दिसून येते, जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते.”

बागी ४’ची स्टारकास्ट

‘बागी ४’ हा टायगर श्रॉफचा दमदार 'ॲक्शनपट असला तरी संजय दत्त या चित्रपटातील मुख्य आकर्षण ठरला आहे. त्याच्या जोडीला चित्रपटाची स्टारकास्टही तगडी असल्याने प्रेक्षकांसाठी हा चित्रपट अधिक रंगतदार ठरला आहे. या चित्रपटात माजी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू, लोकप्रिय अभिनेत्री सोनम बाजवा, बहुप्रतिभावान अभिनेते श्रेयस तळपदे आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जाणारे सौरभ सचदेवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विविध कलाकारांच्या उपस्थितीमुळे कथा अधिक प्रभावी झाली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. हर्ष यांनी केले असून त्यांच्या दिग्दर्शनशैलीचीही चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >