Friday, September 5, 2025

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला असून, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar)  यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बारामतीत काढलेल्या ओबीसींच्या मोर्चात बोलताना हाके यांनी शरद पवार यांच्यावर “मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं” अशी टीका केली आहे. हाके म्हणाले की, शरद पवार मतं ओबीसींची घेतात पण पाठिंबा मात्र जरांगेंना देतात. मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला, असं कोणी म्हटलं तर त्याचं “कानफाड फोडा” अशी उघड चेतावणी त्यांनी दिली. देशभरात मंडल आयोग लागू झाला होता, मात्र महाराष्ट्रात तो उशिरा लागू झाला. ही चळवळ पुढे नेण्यासाठी दि बा पाटील, बबनराव ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची भूमिका होती, असे हाके यांनी ठासून सांगितले. शरद पवार कुटुंबाबाहेर सत्ता आणि कारखाने जाऊ देत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “रयत शिक्षण संस्था असो वा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सर्वत्र शरद पवारांनीच अध्यक्षपद घेतलं. महाराष्ट्रातील जवळपास ४०० संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. कुटुंबाच्या बाहेर कारखाने, आमदारकी, खासदारकी जाऊ देत नाहीत” अशी टीका हाके यांनी केली.

अजित पवारांवर हल्लाबोल

अजित पवारांवर देखील त्यांनी हल्लाबोल केला. “कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा, कंपाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा सवाल करत हाके यांनी पवार कुटुंबाच्या सत्तेतील दबदब्याचा पर्दाफाश केला. “सत्तेतून पैसा, पैशातून कारखाना” अशी चक्राकार व्यवस्था त्यांनी केल्याचा आरोप हाके यांनी केला. महाराष्ट्रातील सामान्य लोक, दलित, ओबीसींच्या घामाचा पैसा पवार कुटुंबाच्या कारखान्यांमध्ये ओतला जातो, अशी टीका त्यांनी केली. ओबीसी आरक्षण धोक्यात आलं तर “ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी” अशी लढत होईल, असा इशाराही हाके यांनी दिला. “पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होती. आता जर आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला तर पुढच्या निवडणुकीत डुप्लीकेट ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशीच टक्कर दिसेल,” असे हाके म्हणाले.

सभेत प्रकाश आंबेडकरांचा फोन

मोर्चादरम्यान हाके यांना प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी जनतेशी थेट संवाद साधत, “हे आरक्षण जबरदस्ती दिलं गेलं आहे, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल” असा इशारा दिला. बारामतीतील या मोर्चामुळे पवार कुटुंबाविरोधातील ओबीसींचा रोष आणखी उफाळून आला आहे.

फोनवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

मी अगोदरपासूनच गरीब मराठ्यांना समजावून सांगत होतो की, तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका, त्यामुळे दोघांमधील भांडण सुरू होईल. ओबीसीच्या आरक्षणाचा ताट ओबीसींनाच राहिलं पाहिजे, मराठा समजाला आरक्षण पाहिजे असेत तर तु्म्ही वेगळं मागा, तरच ते टिकेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >