Wednesday, September 3, 2025

विश्वामित्र

विश्वामित्र

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी

विश्वामित्रांच्या चरित्राला किंबहुना सर्वच ऋषीवरांच्या चरित्राला असलेल्या गूढपावन वलयाला साजेशी एक कथा म्हणजे विश्वामित्रांनी निर्माण केलेली प्रतिसृष्टी. विश्वामित्र जेव्हा तपस्येसाठी गेले होते, त्या समयी अयोध्येचा श्रीरामावतारापूर्वीचा एक राजपुत्र त्रिशंकू- मूळ नाव सत्यव्रत हा हूड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या पित्याने त्याला हद्दपार केले होते. त्या सुमारास विश्वामित्र तपश्चर्येला गेले होते. तेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, विश्वामित्रांच्या पत्नी व पुत्र अन्नावाचून तळमळत असता त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था त्रिशंकूने केली. तपश्चर्येहून परत आल्यावर विश्वामित्रांना हे कळले. आपल्या राज्यापासून वंचित त्रिशंकूला विश्वामित्रांनी राज्य मिळवून दिले. त्याच्याकडून सत्कर्मरूपी अनेक यज्ञयागही करवून घेतले. त्रिशंकूला सदेह स्वर्गास जाण्याची आकांक्षा होती. विश्वामित्रांनी त्याला स्वर्गात पाठवले, पण इंद्राने त्यास स्वर्गाहून परत पाठवले, आता त्रिशंकूसाठी मृत्यूलोकाचे दारही बंद झाले होते. स्वर्ग नाही, पृथ्वीही नाही अशी अवस्था झाल्यामुळे त्रिशंकू मध्येच लोंबकळत राहिला, तेव्हा विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करून नवा स्वर्ग साकारला. उत्तम नियोजनाने, अथक कार्यकौशल्याने, शासनाने स्वर्गही निर्माण करता येतो, हे या कथेतील सार घेता येईल.

ब्रह्मर्षी वसिष्ठांविषयी असलेला विश्वामित्रांच्या मनातील वैरभाव जेव्हा समूळ लयाला गेला तेव्हा मेघांच्या आच्छादनातून बाहेर आलेल्या सूर्याप्रमाणे विश्वामित्रांचे व्यक्तिमत्त्व पूर्ण उजळून निघाले. क्षात्रवृत्ती घेऊन जन्माला आलेल्या विश्वामित्रांनी ब्राह्मण्याला हस्तगत केले. विश्वज्ञानाप्रमाणे आत्मज्ञानानेही ते संपन्न झाले. पूर्णब्रह्माचा साक्षात्कार होऊन ते ब्रह्मर्षीपदाने अलंकृत झाले. विश्वातील अखिल प्राणिमात्रांबद्दल त्याच्या अंतःकरणात अपार कळवळा उत्पन्न झाल्यामुळे त्यांचे ‘विश्वामित्र’ हे नाव सार्थ ठरले. वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोन्ही ब्रह्मर्षींनी विश्वकल्याणासाठी आपले अवघे जीवन वेचले. त्यांच्यामुळे जनतेची सर्वांगीण प्रगती होऊ लागली. राजदरबारी विद्वानांना मानाचे स्थान मिळू लागले.

जेव्हा विश्वामित्रांच्या विश्वशांती यज्ञात राक्षस विघ्न आणत होते तेव्हा विश्वामित्रांनी यज्ञरक्षणासाठी श्रीरामाला पाठविण्याची दशरथराजाजवळ मागणी केली. त्यावेळी आपल्या कोवळ्या कुमाराला पाठवायला दशराजाचे मन धजेना, तेव्हा दशरथराजाचे कुलगुरू वसिष्ठ यांनी “ब्रह्मर्षी विश्वामित्र बरोबर आहेत, त्यामुळे राजाने निःशंकपणे आपल्या पुत्रांना पाठवावे’ असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी श्रीरामालाही “विश्वामित्रांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणे हे तुझे कर्तव्य आहे” असा आदेश दिला. एवढा विश्वामित्रांबद्दल वसिष्ठांच्या मनात एवढा विश्वास होता.

ऋग्वेदातील तिसरे मंडल विश्वामित्रांच्या नावावर आहे. त्यातील सूक्ते ही भावपूर्ण व ओजस्वी आहेत. ज्ञानरूप यज्ञाची उपासना विश्वामित्रांच्या पुढील ऋचेत दिसते, प्राञ्चं यज्ञं चकृम वर्धतां गीः समिभ्दिरग्निं नमसा दुवस्यन् । दिवः शशासुर्विदथा कविनां गृत्साय चित्तवसे गातुमीषुः ।।२।।ऋ.मं.३सू.१ आम्ही यज्ञाला प्रतिदिन वाढवत नेतो. आमच्या जीवनात त्यागप्रधान यज्ञीयवृत्ती प्रतिदिन वाढत राहो. आमच्या जीवनात ज्ञानाची वाणी वृद्धिंगत व्हावी. आम्ही स्वाध्यायाद्वारे आमचे ज्ञान वाढवावे. जलप्रवाहाच्या साह्याने विद्युतनिर्मिती होऊ शकते, हे आपल्या प्राचीन ऋषींना ज्ञात होते. ब्रह्मर्षी विश्वामित्रांच्या पुढील ऋचेवरून ते सिद्ध होते. मयो दधे मेधिरः पूतदक्षो दिवः सुबन्धुर्जनुषा पृथिव्याः। अविन्दन्नु दर्शतमप्स्वन्तर्देवासो अग्निमपसि स्वसृणाम् ॥३॥ऋ.मं.३सू.१ या ऋचेचा भावार्थ असा की अग्निदेव हे प्रज्ञावंत, विशुद्ध, बलसंपन्न आणि जन्मतःच उत्कृष्ट बन्धुत्वभावाने युक्त आहेत. ते द्युलोक आणि पृथ्वीलोकात सर्वत्र सुख स्थापन करतात. प्रवाही जलधारांत गुप्त रूपाने स्थित असलेल्या विद्युतरूप अग्निदेवांना दिव्य वैज्ञानिकांनी सत्कार्याला गती देण्यासाठी प्रकट केले. अशा या तेजस्वी ऋषीवरांनी आपली महान संस्कृती घडविली आहे.

Comments
Add Comment