
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
जीवनविद्येचे कार्य क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक म्हणजे काय तर लोकांची मानसिकता बदलणे ही क्रांती आहे. एखाद्याची मानसिकता बदलली व तो सत्तेवर गेला की तो लोकांचे भलेच करणार, कारण त्याला कळलेले आहे की लोकांचे भले करण्यांतच आपले भले आहे व लोकांचे वाईट होण्यात आपले वाईट आहे. हे एकदा त्याला कळले की त्याची मानसिकता बदलेल. वास्तविक हे त्यांना अनुभवातून जाणले पाहिजे. अनुभवातूनच शिकले पाहिजे.
जीवनविद्येचा एक अमृततुषार आहे “जो दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो तो खरा शहाणा, जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो दीड शहाणा व जो कुणाच्याच अनुभवातून शिकत नाही तो पेडगावचा शहाणा “. गंमत अशी आहे की, दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणे महत्वाचे आहे. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो ते खरे शहाणपण. पण आज लोक म्हणतात की आम्ही स्वतः अनुभव घेणार व शिकणार. एक घडलेली गोष्ट सांगतो. आमचेच एक नातेवाइक, त्यांच्या मुलाला एक मुलगी सांगून आलेली. त्या मुलीच्या घराण्याबद्दल ते भांडखोर आहेत हे प्रसिद्ध होते. मुलाच्या आईवडिलांनी मुलाला सांगितले, अरे गावात या मुलीच्या घराण्याची ते भांडखोर आहेत अशी प्रसिद्धी आहे तर तू ही मुलगी करू नको. या मुलामुलींचे रेल्वेतून जातायेता सूत जुळलेले. मुलगा म्हणाला मी अनुभव घेऊन पाहतो. लग्न केले व जो अनुभव यायचा तो आलाच.
हे सांगण्याचे कारण इतकेच की, लोक स्वतःच्याच अनुभवावरून शिकणार म्हणतात म्हणून ते दीड शहाणे. हे शहाणपण अगदी शेवटी सुचते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काय उपयोग. शिकायचे असते ते तरुणपणी. जीवनविद्येचे हे जे ज्ञान आहे ते तरुणपणी शिकायचे असते किंबहुना हे बालपणी मिळाले पाहिजे. बालपणीच जर त्याला हे संस्कार मिळाले तर तो पुढे काहीतरी करून दाखविले. हे जे काही मी सांगतो आहे ते संस्कार म्हणजे परमेश्वराबद्दलचे ज्ञान. आज गंमत अशी आहे की परमेश्वर ही संकल्पनाच लोकांना नकोशी झालेली आहे व त्याचेच दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत म्हणून जीवनविद्येने परमेश्वर हा विषय घेतलेला आहे. काहीही घडले तर परमेश्वराला रिटायर्ड करा किंवा परमेश्वर नको किंवा नाहीच म्हणणे हा उपाय नाही. परमेश्वरबद्दलचे अज्ञानच सर्व दुःखाला कारणीभूत आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. व्याधी झाली तर माणसाला मारून टाका म्हणणे हा उपाय नाही. माणसाला मारून व्याधी कशी जाईल. व्याधी जाण्यासाठी त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे उपचार केले पाहिजे. म्हणूनच योग्यवेळी “परमेश्वर हाच आपल्या जीवनाचे मूळ आहे व तोच आपल्या जीवनाचे फळ आहे.” या ज्ञानाचे संस्कार झाले पाहिजेत.